Zaira Wasim : ‘दंगल’ या गाजलेल्या सिनेमात दिसलेली बालकलाकार अभिनेत्री जायरा वसीमचा निकाह झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली. जायराने सिनेमात छोट्या गीता फोगाटची भूमिका देखील साकारली होती. नंतर काही सिनेमे केल्यानंतर २०१९ साली तिने फिल्म इंडस्ट्रीला पर्याने बॉलीवूडला रामराम केला आणि धर्माचा मार्ग स्वीकारला. आता जायराने वयाच्या २४ व्या वर्षी नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
जायरा वसीमने सोशल मीडियावर यासंदर्भात दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत ती निकाहनामा साईन करताना दिसत आहे. तिच्या हातावर मेहंदीचा गडद रंग चढलेला आहे. तर; दुसऱ्या फोटोत ती तिच्या पतीसोबत उभी आहे. यामध्ये जायराने लाल रंगाचा गोल्डन वर्क असलेला लेहेंगा परिधान केला आहे. जायराने पतीचा चेहरा आणि ओळख मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे. ‘कुबूल है X3’ असं कॅप्शन देखील तिने या पोस्टला दिलं आहे.
जायराच्या या पोस्टने चाहत्यांना सुद्धा आनंदाचा धक्का दिला आहे. चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव केला आहे. जायरा अगदी लहान वयातच अनेकांची क्रश बनली होती. तिचं काश्मिरी सौंदर्य अगदी कोणालाही प्रेमात पाडणारंच होतं. वाढदिवसाच्या एक आठवड्याआधीच तिने लग्न केल्याची बातमी शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला. जायरा वसीम ‘दंगल’ सिनेमावेळी अगदी १६ वर्षांची होती. नंतर तिने ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमांमध्येही उत्तम काम केलं.
हे देखील वाचा – Pune News : तुम्हीही सणासुदीला बाहेरून मिठाई आणता का? तर सावधान! दोन महिन्यात तब्ब्ल दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त..