Home / महाराष्ट्र / Raj Thackeray’s warning: राज ठाकरेंचा इशारा ! यादी सुधारल्यावरच निवडणूक होईल! 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मविआ व मनसेचा मोर्चा

Raj Thackeray’s warning: राज ठाकरेंचा इशारा ! यादी सुधारल्यावरच निवडणूक होईल! 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मविआ व मनसेचा मोर्चा

Raj Thackeray’s warning-मतदार यादीतील प्रचंड घोळावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुटून पडले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ करीत त्यांनी मोदींवर...

By: Team Navakal
Mawia


Raj Thackeray’s warning
-मतदार यादीतील प्रचंड घोळावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुटून पडले. ‘लाव रे तो व्हिडिओ’ करीत त्यांनी मोदींवर टीका केली आणि आयोगाला इशारा (Raj Thackeray’s warning )दिला की, मतदार यादी सुधारल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. त्यानंतर दुपारी मविआ व मनसेच्या नेत्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळाविरुध्द मविआ व मनसे एकत्रितपणे शनिवार 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. यानंतरही हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत जाईल.


या पत्रकार परिषदेला उबाठा खासदार संजय राऊत, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सचिन सावंत, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजू पाटील, गिरीश सावंत, अभिजित पानसे उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात एक बैठक पार पडली.


पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष लढाई लढत आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत ही लढाई लढली जात आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही लढाई सुरू झालेली आहे. या लढाईतून काय निष्पन्न होईल याविषयी शंका आहे. राज ठाकरे यांनी आजच दोन मुद्दे मांडले. मतदान करा किंवा करू नका, निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालेले आहे. या मॅच फिक्सिंगविरुद्ध ही आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख बोगस मतदार आजही आहेत. हे मतदार आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत. या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदार यादीतून बाहेर काढू. गृहमंत्री हे निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख असतात. त्यामुळे अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत घुसलेले एक कोटी मतदारांना आधी बाहेर काढावे आणि त्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करावी.


संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणूक याद्यांमध्ये घोटाळा करून महायुती सत्तेवर आलेली आहे. सत्ताधारी आमदारच तशी कबुली देत आहेत. मतदार याद्या पवित्र आणि शुद्ध असायला हव्यात. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक असायला हव्यात. यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी वगळून सर्व प्रमुख पक्ष लढत आहेत. दोन दिवस सातत्याने निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या. आम्ही मांडलेल्या आमच्या भूमिका मानायला निवडणूक आयोग तयार नाही. आमच्या याद्या निर्दोषच असल्याचे ते म्हणत आहेत. निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केलेले आहे. निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर त्यांना दणका द्यावाच लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल. यासाठीच 1 नोव्हेंबरला शनिवारी निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यांतून गावा-गावांतून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. मतदारांची ताकद देशाच्या पंतप्रधानांना आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मविआतील इतर नेते करतील.


काँग्रेसचे सचिन सावंत 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला पाठिंबा असल्याचे सांगत म्हणाले की, विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकार्‍यांची, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांची भेट घेतली होती. मात्र विरोधी पक्षाच्या मतांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार किंमत दिलेली दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 41 लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांतच महाराष्ट्रात सहा लाख 55 हजार मतदार वाढले. परंतु निवडणूक आयोगाने हात झटकले आहेत. मतदारांची यादी आक्षेपार्ह आहे. या यादीत घोळ आहे. विधानसभा निवडणूक घोळ असलेल्या मतदार यादीच्या मदतीने झाली. आता नव्या मतदार यादीतही मोठा घोळ झालेला आहे. लोकशाही प्रक्रियेत आदर्श निवडणूक प्रक्रिया राबवली जात नाही. हे लोकशाहीला घातक आहे. याचा विरोध करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत.  1 नोव्हेंबरच्या मोर्चात सर्व विरोधी पक्ष उतरतील.  


शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिलेली नाहीत. दुबार मतदार काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार, ज्यांचे पत्ते नाहीत त्यांचे तुम्ही काय करणार आहात? हा खुलासा आयोगाने करायला हवा. आयोग अनेक गोष्टी लपवून ठेवत आहे. सत्तेत असलेले नेते जर मोर्चात सहभागी झाले तर त्यांना कोणाची ना नाही. पण, ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत.


मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले की, निवडणूक आयोगावरचा लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतदार यादीमध्ये घोळ झाल्याची भावना लोकांच्या मनात आहे. आमच्या पक्षाने निवडणूक आयोगाला निवेदन व पत्राद्वारे काही मुद्दे मांडले होते. त्यानंतर आयोगाने जिल्हाधिकार्‍यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ असा की, निवडणूक आयोगाने काहीतरी गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. आयोगाने घोळ ओळखला असेल, तरी तो जाहीरपणे पाहिलेला नाही. त्यासाठी शनिवारी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे. 

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

कोरोना काळात चुकीचे उपचार; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

दिल्लीनंतर गुजरातमध्येभर न्यायालयात बूट हल्ला

उत्तर प्रदेशात धर्मांतर केल्याचे आरोप खोटे कोर्टाचा संताप !एकही सबळ पुरावा नाही

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या