Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने जून 2024 मध्ये सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. महिलांना दरमहा 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेत पुरुषांनी कोट्यावधी रुपयांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) मिळालेल्या आकडेवारीनुसार, ही योजना महिलांसाठी असूनही, किमान 12,431 पुरुषांनी या योजनेतून लाभ मिळवला आहे. RTI अर्जाला उत्तर देताना महिला आणि बाल विकास (WCD) विभागाने स्वतः याबाबत माहिती दिली. या अनियमिततेमुळे शासनाचे एकूण सुमारे 164.52 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुरुष आणि अपात्र महिलांना मिळाले कोट्यवधी रुपये
RTI उत्तरातील आकडेवारीनुसार अपात्र व्यक्तींना सुमारे 164.52 कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
पुअंदाजे 12,431 पुरुषांनी 13 महिन्यांसाठी प्रत्येकी 1,500 रुपये याप्रमाणे सुमारे 24.24 कोटी रुपयांचा लाभ घेतला. याशिवाय, नियमांनुसार अपात्र ठरलेल्या 77,980 महिलांनाही 12 महिन्यांसाठी सुमारे 140.28 कोटी रुपयांचे वाटप चुकीच्या पद्धतीने झाले.
महिला आणि बाल विकास विभागाने या अपात्र ठरलेल्या पुरुषांना आणि 77,980 महिलांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने वितरित केलेली ही रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
लाभाचे निकष पूर्ण न करणारे 26 लाख लाभार्थी
योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी केवळ पुरुष लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित नाहीत. या वर्षी 25 ऑगस्ट रोजी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘X’ वर पोस्ट करत सांगितले होते की, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, योजनेच्या 2.41 कोटी लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या पात्रतेच्या निकषांवर बसत नाहीत.
त्यानंतर, विभागीय स्तरावर पडताळणीसाठी ही प्राथमिक यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. सध्या 26.34 लाख संशयित खात्यांमध्ये निधी वितरण थांबवले आहे. तसेच, काही शासकीय कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, योजनेचा पुढील गैरवापर टाळण्यासाठी, सरकारने सध्याच्या आणि नवीन सर्व लाभार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘ई-केवायसी’ पडताळणी मोहीम सुरू केली आहे, जी लवकरच पूर्ण होईल.
हे देखील वाचा – अमेझॉनची AWS सेवा काय आहे? यातील अडथळ्यामुळे हजारो वेबसाइट्स-ॲप्स बंद पडण्याचे नेमके कारण काय?