Japan PM Sanae Takaichi : जपानला अखेर त्यांच्या पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या आहेत. चीनबाबत कठोर भूमिका घेणाऱ्या आणि सामाजिक दृष्ट्या पुराणमतवादी असलेल्या सनाई तकाईची (Sanae Takaichi) यांनी बहुमत सिद्ध केले. शेवटच्या क्षणी त्यांनी युती केल्यामुळे जपानला पाच वर्षांतील पाचव्या पंतप्रधान मिळाल्या आहेत.
जपानच्या संसदेने तकाईची यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. पहिल्याच फेरीत त्यांनी अनपेक्षितपणे बहुमत मिळवले. महारामटोर नारुहितो यांची भेट घेतल्यानंतर त्या औपचारिकपणे पदभार स्वीकारतील.
युती आणि सत्ता समीकरणे
4 ऑक्टोबर रोजी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या (LDP) प्रमुख बनलेल्या तकाईची यांना बहुमत गमवावे लागले होते. त्यांच्या पुराणमतवादी दृष्टिकोनामुळे आणि पक्षातील निधी घोटाळ्यामुळे कोमेइटो पक्षाने 6 दिवसांनंतर युती तोडली होती. त्यामुळे तकाईची यांनी सुधारणावादी आणि उजव्या विचारसरणीच्या जपान इनोव्हेशन पार्टीसोबत (JIP) युती केली. या युतीमुळे त्यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा मिळाला.
जपान इनोव्हेशन पार्टीने अन्नधान्यावरील उपभोग कर दर शून्य करणे, कॉर्पोरेट आणि संस्थात्मक देणग्या रद्द करणे आणि खासदारांची संख्या कमी करणे यासारख्या सुधारणांना पाठिंबा दिला आहे.
तकाईची सोमवारी जपानची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आणि भावी पिढ्यांसाठी जबाबदार देश म्हणून जपानची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान मोदींकडून विशेष अभिनंदन
जपानच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने सनाई तकाईची यांची पंतप्रधानपदी निवड केल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदींनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी मी ताईची यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. दोन्ही देशांचे संबंध इंडो-पॅसिफिक (Indo-Pacific) आणि त्यापलीकडील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.
महिलांच्या सहभागावर लक्ष आणि सामाजिक भूमिका
जागतिक आर्थिक मंचच्या 2025 ग्लोबल जेंडर गॅप अहवालात 148 देशांमध्ये जपानचा क्रमांक 118 वा आहे. कनिष्ठ सभागृहात महिला खासदारांचे प्रमाण सुमारे 15 टक्के आहे. तकाईची यांनी निवृत्त पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या मंत्रिमंडळातील 2 महिला मंत्र्यांच्या तुलनेत मंत्रिमंडळात महिलांचा सहभाग वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
64 वर्षीय तकाईची यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता वाढवण्याची आशा व्यक्त केली आहे आणि आपल्या रजोनिवृत्तीच्या अनुभवांबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. मात्र, त्या विवाहित जोडप्यांना समान आडनाव वापरण्याची आवश्यकता असलेल्या 19 व्या शतकातील कायद्यात बदल करण्याच्या विरोधात आहेत.
हे देखील वाचा – Best CNG Cars: ‘या’ आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 5 स्वस्त सीएनजी कार्स; किंमत फक्त 4.62 लाख रुपयांपासून