Home / News / PM Modi insist for Swadeshi : स्वदेशी घ्या, तेलाचा वापर कमी करा पंतप्रधान मोदींचे दीपावलीनिमित्त आवाहन

PM Modi insist for Swadeshi : स्वदेशी घ्या, तेलाचा वापर कमी करा पंतप्रधान मोदींचे दीपावलीनिमित्त आवाहन

PM Modi insist for Swadeshi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहित दीपावली शुभेच्छा दिल्या असून, ऑपरेशन सिंदूरची...

By: Team Navakal
PM Narendra Modi

PM Modi insist for Swadeshi – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहित दीपावली शुभेच्छा दिल्या असून, ऑपरेशन सिंदूरची प्रेरणा प्रभू श्रीरामापासून मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि नक्षलवादाविरोधातील लढ्यातील यशाबद्दल गौरवोद्गार काढतानाच स्वदेशीवर भर देण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे.

जेवणातील तेल किमान 10 टक्के कमी करा, स्वच्छता पाळा, योग करा असे आवाहन त्यांनी केले आहे.अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. याकडे त्यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले आहे. भगवान श्रीराम आपल्याला नैतिकदृष्ट्या योग्य बाबींचे पालन करण्याची शिकवण देतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्यही देतात.

काही महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आपण याचे जिवंत उदाहरण पाहिले. या मोहिमेत भारताने केवळ नैतिकदृष्ट्या योग्य बाबींचे पालनच केले नाही तर अन्यायाचा प्रतिकारही केला, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.मोदी यांनी नक्षलवादावरही भाष्य केले आहे. ते म्हणतात की, भारतातील काही दुर्गम जिल्ह्यांतून नक्षलवाद व माओवादाचा बिमोड झाल्याने अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे यावर्षी उजळत आहेत. त्यामुळे ही दिवाळी विशेष आहे.

अलीकडच्या काळात अनेक नक्षली हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. भारतीय राज्यघटनेवर विश्वास व्यक्त करीत आहेत. ही देशासाठी एक मोठी उपलब्धी आहे. अलिकडेच महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण केले. त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे.मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 22 सप्टेंबरपासून केलेल्या जीएसटी सुधारणांचेही कौतुक केले.

ते म्हणतात की या सुधारणांमुळे नागरिकांनी हजारो कोटी रुपयांची बचत केली आहे. गेल्या काही वर्षांत जगात अस्थिरता असतानाही भारत स्थैर्य आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून उदयास आला असून लवकरच आपण जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ. विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी नागरिकांना योगदान देण्याची साद देशवासियांना घालतानाच स्वदेशीचा अंगिकार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना जोपासा.

प्रत्येक छोटा प्रयत्न आपल्याला विकसित भारतच्या दिशेने झपाट्याने पुढे नेईल. स्वदेशीचा अंगिकार करा, तुम्ही वापरत असलेली वस्तू ही स्वदेशी आहे, असे अभिमानाने सांगा. आरोग्याला प्राधान्य द्या. जेवणातील तेल 10 टक्क्यांनी कमी करा. स्वच्छता पाळा, योग साधना करा. आपले हे सर्व प्रयत्न आपल्याला विकसित भारतकडे झपाट्याने घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या भाषेवरून राजकारण केले जात असताना सर्व भाषांचा सन्मान करा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.एका दिव्याने दुसरा दिवा उजळतो तेव्हा पहिल्या दिव्याचा प्रकाश संपत नाही तर तो वाढतो, ही शिकवण आपल्याला दिवाळी देते. हीच भावना व शिकवण लक्षात घेऊन सौहार्द, सहकार आणि सकारात्मकता यांच्या दिव्यांनी आपण समाज व आपला परिसर या दिवाळीला उजळून टाकूया, असे आवाहन मोदी यांनी आपल्या पत्राचा समारोप करताना केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या