President Murmu visit Sabarimala Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील प्रसिद्ध शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात ऐतिहासिक भेट दिली. अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
राष्ट्रपती मुर्मू या मंदिरात भेट देणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत; यापूर्वी 1970 च्या दशकात माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी येथे भेट दिली होती.
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळीच्या वयोगटातील (10 ते 50) महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणाऱ्या पारंपारिक नियमाला रद्द केले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी राष्ट्रपतींनी दिलेली ही भेट प्रतीकात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भगवान अय्यप्पा हे चिरंजीव ब्रह्मचारी मानले जातात.
भाजप खासदार बांदी संजय कुमार यांनी ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत राष्ट्रपतींच्या या भेटीचे कौतुक केले. “त्या 67 वर्षांच्या आहेत. त्यांनी कोणताही नियम मोडला नाही, कोणाच्याही श्रद्धेला धक्का लावला नाही, तर केवळ श्रद्धेचा मान राखला. असे करताना त्या इरुमुडी घेऊन भगवान अय्यप्पांसमोर नतमस्तक होणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या,” असे त्यांनी नमूद केले.
President Droupadi Murmu performed Darshan and Puja at the Sabarimala Temple. She prayed before Lord Ayyappa for the well-being and prosperity of fellow citizens. pic.twitter.com/moJxzBS28h
— President of India (@rashtrapatibhvn) October 22, 2025
राष्ट्रपती मुर्मू यांनी यात्रेच्या पारंपरिक नियमांनुसार पांबा बेस कॅम्पवर आगमन केले. त्यांनी पंपा नदीत पाय धुतल्यानंतर जवळच्या भगवान गणपती मंदिरात प्रार्थना केली. काळ्या साडीत असलेल्या राष्ट्रपतींनी ‘केट्टुनिरै’ समारंभात भाग घेतला, जिथे मुख्य पुजाऱ्याने त्यांची ‘इरुमुडिक्केट्टू’ म्हणजेच भाविक मंदिरात घेऊन जाणारे पवित्र गाठोडे तयार केले.
त्यांचे जावई, गणेश चंद्र होम्ब्रम आणि इतर कर्मचाऱ्यांनीही स्वतःचे पवित्र गाठोडे तयार केले. पांबा येथील विधी पूर्ण झाल्यानंतर, हा गट विशेष चारचाकी वाहनांनी सन्निधानम (मुख्य मंदिर परिसर) येथे पोहोचला.
सन्निधानम येथे मंदिराचे मुख्य पुजारी कंडरारू महेश मोहनारू यांनी पारंपरिक स्वागत करत राष्ट्रपतींचे औपचारिक स्वागत केले. राज्याचे देवस्वम मंत्री व्ही. एन. वासवन यांनीही त्यांचे स्वागत केले. पवित्र गाठोडे आपल्या डोक्यावर घेऊन त्यांनी मुख्य गाभाऱ्याकडे जाणाऱ्या 18 पवित्र पायऱ्या चढल्या. त्यांनी भगवान अय्यप्पांचे ‘दर्शन’ घेतले व पूजा केली.
त्यांच्या भेटीदरम्यान इतर भाविकांसाठी प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला होता. सबरीमला भेट हा राष्ट्रपती मुर्मू यांच्या केरळच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे.
हे देखील वाचा – भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे शिल्पकार, पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे 100 व्या वर्षी पुण्यात निधन