Congress :लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार्या महाविकास आघाडीला मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तडे जाऊ लागले आहेत. मुंबई काँग्रेसने (Congress)काँग्रेसचे स्वबळाचे संकेत! मविआत फूट?दोन्ही ठाकरे नकोत! सपाही आघाडीतून बाहेर दोन्ही ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे, असे आज काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सांगितले. तर समाजवादी पक्षानेही दोन्ही ठाकरेंसह काँग्रेसलाही विरोध म्हणून मविआतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. उबाठाने मविआत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला आहे. मात्र, दोन्ही ठाकरे बंधू आणि मविआतील इतर पक्ष यांची युती होण्याची शक्यता मावळत चालली आहे.
मतदार याद्यांमधील घोळाविरुद्ध राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड़णूक हे पक्ष एकत्र लढतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता या नव्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीची फुटीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत युती करण्याच्या विरोधात यापूर्वीच जाहीर भूमिका घेतली होती. आता मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनीही केवळ मनसेच नव्हे, तर उबाठाशी युती करण्याविरोधात सूर लावला आहे. ते म्हणाले की, उद्धव व राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांसोबत काँग्रेस पक्ष युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका मांडली होती. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत अलिकडेच झालेल्या काँग्रेस पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीतही दोन्ही ठाकरेंसोबत जाण्यास विरोध करणारी भूमिका मांडण्यात आली आहे. उध्दव ठाकरेंच्या पक्षासोबतही जाण्यास स्थानिक कार्यकर्ते तयार नाहीत. महाविकास आघाडीतील आमचे संबंध टिकून राहतील. पण मुंबई महापालिकेच्या लढाईत काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर उतरणार आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांनीही जगताप यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असून याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांच्यातील युतीची शक्यता कमी होत चालली असतानाच समाजवादी पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमचा पक्ष मुंबईत स्वबळावर लढणार आहे.
समाजवादी पक्षाला स्वतःची विचारधारा, स्वतःचा मतदार वर्ग आणि स्वतःची ताकद आहे. आम्हाला इतर पक्षांच्या आधाराची गरज नाही. महाविकास आघाडीत काही पक्ष परस्परांशी चर्चा करत आहेत, परंतु समाजवादी पक्ष त्या चर्चेचा भाग नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. बाबरी मशीद पाडल्याबद्दल आनंद व अभिमान व्यक्त करणार्या उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत आम्ही युती करणार नाही आणि बिहारी व उत्तर भारतीयांना लक्ष्य करणार्या राज ठाकरेंच्या पक्षासोबतही जाणार नाही. काँग्रेस पक्षाने बिहारमध्ये जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबतही युती करणार नाही.
आझमी यांची घोषणा म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक मोठा हादरा मानला जात आहे. सपा आणि काँग्रेस स्वतंत्र लढले तर उत्तर भारतीय आणि मुस्लिमांची मते विभाजित होण्याची शक्यता असून याचा फटका महायुतीविरोधात लढणार्या पक्षांना बसू शकतो.
वरिष्ठांशी चर्चाच नाही
खा. राऊतांचा इन्कार
भाई जगताप यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत, असा दावा केला. ते म्हणाले की, देश पातळीवर इंडिया आघाडी आणि राज्यात मविआ काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निर्माण केली आहे. भाजपाचा पराभव करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्याबद्दल मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेसचा कोणीतरी नेता वेगळी भूमिका घेत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर तो राज ठाकरे यांचा प्रश्न आहे. या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी अद्याप चर्चाच झालेली नाही.
हे देखील वाचा –
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला









