Thackeray's Diwali राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे फुटलेल्या शरद पवार कुटुंबाने यंदा एकत्र दिवाळी साजरी केली नाही. पण राजकीय गरजेपोटी एकत्र आलेल्या ठाकरे कुटुंबाची (Thackeray's Diwali )एकत्र दिवाळी झाली.
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या कालच्या शिवतीर्थ भेटीनंतर ठाकरे कुटुंबाने आज बहीण जयजयवंती ठाकरे – देशपांडे यांच्या निवासस्थानी जाऊन एकत्र भाऊबीज साजरी केली. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जवळपास 4 महिन्यांपासून सुरू आहे. ठाकरे बंधूंची आजची 9 वी भेट होती. दोन्ही नेत्यांच्या वारंवार होणार्या भेटींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला आणि दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मोठ्या कुटुंबाची एकत्र दिवाळी दरवर्षी गाजायची. पवार कुटुंबातील महिला आपल्या भावाला एकत्र येऊन ओवाळायच्या त्याचे फोटो झळकायचे. राजकारण एकीकडे आणि खाजगी नातेसंबंध एकीकडे हे सुप्रिया सुळे यांचे ठरलेले वाक्य असायचे. मात्र राजकीय चढाओढीच्या पाषाणावर हे कुटुंब विखुरले.

अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यानंतर एक दिवाळी या कुटुंबाने एकत्र साजरी करण्याचा प्रयत्न केला. काकीला भेटायला सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी गेल्याने खळबळही माजली. मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा वरचढ ठरली आणि यावर्षी पवार कुटुंबाची दिवाळी एकत्रित झाली नाही. शेतकर्यांवर संकट कोसळले म्हणून यावेळी आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असे सांगून सुप्रिया सुळे यांनी वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला , पण भाऊबीजेलाही बहीण भाऊ एकत्र आले नाहीत. पवार कुटुंबात हे वादळ उठलेले असतानाच राजकारणामुळेच एकत्र आलेले ठाकरे बंधू यांनी एकत्रित दिवाळीचे दृश्य जनतेपर्यंत पोहोचवले.
उद्धव ठाकरे काल राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थवर गेले होते. त्यानंतर आज भाऊबीज सणानिमित्ताने दुपारी 1 वाजताच्या सुमारास डेफोडील इमारतीतील बहीण जयजयवंती यांच्या घरी उद्धव व राज सहकुटुंब पोहचले होते.त्यानिमित्ताने ठाकरे बंधू आणि कुटुंब पुन्हा एकत्र आले होते. यावेळी जवळपास 2 तासांचा कौटुंबिक सोहळा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांची कन्या उर्वशीने अमितसह आदित्य आणि तेजस या आपल्या भावांनाही ओवाळले.
ठाकरे बंधूंच्या 9 भेटी
5 जुलैला 19 वर्षानंतर मराठी भाषा मेळाव्यात दोन्ही बंधू एकाच मंचावर आले. 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले होते. 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन सहकुटुंब गणरायाचे दर्शन घेतले. 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे मावशी कुंदा ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले होते. 5 ऑक्टोबरला खा. संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब आले.त्याच दिवशी राज ठाकरे कार्यक्रम संपल्यानंतर मातोश्रीवर पोहोचले. 12 ऑक्टोबरला राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेले होते. 17 ऑक्टोबरला मनसे दीपोत्सव उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संपूर्ण कुटुंब ठाकरे एकत्र आले होते. 22 ऑक्टोबरला राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेट गेले होते. आज भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंब बहीण जयजयवंती यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज लेफ्टनंट कर्नल बनला
न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरण ; हितेश मेहताचा जामीन फेटाळला
सोशल मीडियावरील कंटेंट हटवण्याचे नियम बदलले; केवळ ‘या’ अधिकाऱ्यांना असणार अधिकार









