Satara young Doctor suicide -आज दिवाळी सण संपल्याच्या दुसर्याच दिवशी महिलांवरील अत्याचाराने महाराष्ट्र हादरला. मुंबईत गजबजलेल्या काळाचौकी परिसरात तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तर फलटण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने पोलिसांनी केलेला बलात्कार आणि मानसिक छळामुळे आत्महत्या केली. (young Doctor suicide) आपले जीवन संपविण्यापूर्वी या डॉक्टरने स्वतःच्या हातावरच चिठ्ठी लिहून हे हादरवणारे आरोप केले. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री तिरंगा हॉटेलमधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटले की, माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर याने चार महिने मानसिक आणि शारीरिक छळ केला.
या सुसाईड नोटमुळे डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. या सुसाईड नोटची माहिती बाहेर येताच संतापाची लाट उसळली. या प्रकरणात आधी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. परंतु नंतर चक्रे फिरू लागली. दुपारपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींवर फलटण शहर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक असलेल्या गोपाल बदनेचे निलंबन करण्यात आले. प्रशांत बनकर हा फलटण पोलिसात कार्यरत असल्याचे सांगितले जात होते. पण तो पोलीस नसल्याचा खुलासा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केला.

डॉ. मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा संबंध त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी सुरू असलेल्या वादाशी असल्याचे उघड होत आहे. या वादाची चौकशी समितीकडून चौकशी सुरू होती. डॉ. मुंडे यांनी या चौकशी समितीला दिलेले पत्रही व्हायरल झाले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, पोलिसांकडून काही संशयित आरोपी आणण्यात येत असे. त्यावेळी पोलिसांकडून संशयित आरोपी फिट असल्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात येत असे. मात्र या प्रकाराला नकार देत वस्तुस्थितीनिहाय अहवाल देणार असल्याचे सांगितले असता माझा छळ सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यात सहभागी होते. एकदा खासदारांनी फोन केला. खासदारांच्या स्वीय सहायकानेच वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी हा फोन लावून दिला होता. त्यांनी तुम्ही बीडच्या असल्याने प्रमाणपत्र देत नाहीत, अशी पोलिसांची तक्रार असल्याचे मला सांगितले.
जूनमध्ये केलेल्या या तक्रारीची दखल न घेतल्याने 13 ऑगस्ट रोजी डॉ. संपदा यांनी माहिती अधिकाराखाली अर्ज करून पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून माहिती मागवली होती. परंतु तिथूनही सहकार्य मिळाले नाही. डॉ. संपदा यांच्या आतेभावाने सांगितले की, संपदा गेल्या दोन वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होती. मागील वर्षभरापासून तिच्यावर सतत राजकीय आणि पोलिसांचा दबाव होता. पोस्ट मॉर्टेम करताना अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून तिच्यावर त्यांना हवा त्या प्रकारचे अहवाल देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. संपदा घरी सगळे सांगत नव्हती. पण ती आपल्या बहिणीला याबाबत सांगायची. तिने जून-जुलै महिन्यात पोलीस उपअधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली होती. पण कारवाई झाली नाही. तिने तीन-चार पानांचे पत्र लिहिले होते, त्यात खासदारांच्या दोन स्वीय सहायकांचा आणि महाडिक नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. संपदाच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
डॉ. संपदाच्या काकांनीही याला दुजोरा देत सांगितले की, संपदावर राजकीय दबाव टाकला जात होता. तिने याबाबत वरिष्ठांना पत्रही लिहिले होते. परंतु काहीच कारवाई झाली नाही. काल तिने आत्महत्या केल्यावर आम्ही रात्री 3 वाजता या ठिकाणी तिचा मृतदेह घेऊन आलो. पण सकाळपासून कोणीही शवविच्छेदन करण्यासाठी आले नाही. सकाळी 7 वाजता शवविच्छेदन केले जाईल, असे सांगितले. पण डॉक्टर जागेवर नाहीत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना 5 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, डॉ. संपदा यांच्याकडून पोलिसांविरोधात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांकडूनही डॉक्टर विरुद्ध तक्रार दाखल असल्याची नोंद आहे. दोघांकडून एकमेकांविरोधात का तक्रार दाखल झाली, याची सविस्तर चौकशी केली जाईल. आरोपींपैकी प्रशांत बनकर इंजिनीअर आहे. त्याचा पोलिसांशी संबंध नाही. प्रशांत बनकर हा महिला डॉक्टरचा परिचित होता. दोघे एकाच तालुक्यातील आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळाली आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे.
या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. या घटनेवरून विरोधकांनीही सत्ताधार्यांवर निशाणा साधला. उबाठा उपनेत्या सुषमा आधारे म्हणाल्या की, नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीसच बलात्कार करत असतील तर जनता कोणाकडे पाहणार? तीन महिन्यांपासून तिला मदत का उपलब्ध झाली नाही? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?
काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे याचे हे निदर्शक आहे. कायद्याचे रक्षक असलेले पोलीसच जर भक्षक बनत असतील तर यापेक्षा काय वाईट आहे? या महिलेला काय त्रास सहन करावा लागला असेल याची कल्पना करवत नाही. सुशिक्षित महिलेला असे पाऊल उचलावे लागत असेल तर सामान्य महिलांची काय परिस्थिती असेल? ज्यांच्याकडून सुरक्षेची हमी मिळाली पाहिजे, तेच मारेकरी झाले तर काय करायचे? पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहेत.
7 दिवसांपूर्वी नाते तोडले होते
प्रेयसीची हत्या! स्वतःलाही मारले
मुंबईतील काळाचौकीच्या गजबजलेल्या परिसरात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास 24 वर्षीय तरुणीवर सोनू बराई या तिच्याच मित्राने चाकूहल्ला केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार केले. यात आधी त्याचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान संध्याकाळी तिचाही मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती दिली की, सोनू आणि जखमी तरुणी या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र सातच दिवसांपूर्वी त्यांचे संबंध तुटले होते.आज काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरून दोघे चालत येत होते. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. अचानकपणे त्या तरुणाने खिशातील चाकू काढला आणि तरुणीवर हल्ला केला. ती तरुणी जीव वाचवण्यासाठी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये गेली. सोनू तिच्या मागे गेला. तिच्यावर चाकूने वार केले. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूचे वार केला. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांचाही मृत्यू झाला.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..
रविवारी मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर आणि मुख्य मार्गिकेची सेवा बंद..
रशियातील तेल खरेदीत भारत कपात करणार; ट्रम्प यांचा पुन्हा दावा









