Honda Shine 125 vs SP125: 125cc मोटारसायकल सेगमेंटमध्ये होंडाचे वर्चस्व आहे. होंडा शाइन 125 ही सर्वाधिक विकली जाणारी आणि भरवशाची बाईक म्हणून ओळखली जाते. मात्र, त्याच प्लॅटफॉर्मवर तयार झालेली व थोडी स्पोर्टी लूक असलेली होंडा एसपी 125 देखील बाजारात उपलब्ध आहे.
अनेक ग्राहक या दोन मॉडेल्समध्ये संभ्रमात पडतात. इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या आधारावर या दोन्ही बाईक्सची सविस्तर तुलना पाहूया, ज्यामुळे तुम्हाला योग्य निवड करणे सोपे होईल.
इंजिन आणि पॉवर आऊटपुट
शाइन 125 आणि एसपी 125 या दोन्हीमध्ये 123.94cc चे सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन आणि 5-स्पीड जोडलेला आहे. इंजिन समान असले तरी, त्यांच्या ट्युनिंगमध्ये फरक आहे. शाइन 125 स्मूथ पॉवर डिलिव्हरी आणि उच्च मायलेज देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. शाइन 125, 10.78 पीएस पॉवर आणि 11 एनएम टॉर्क देते. याउलट, एसपी 125 ला थोडी जास्त पॉवर (10.88 पीएस) आणि 10.9 एनएम टॉर्क मिळतो, ज्यामुळे ती अधिक स्पोर्टी वाटते.
चेसिस, ब्रेक्स आणि टायरमधील फरक
दोन्ही बाईक्समध्ये डायमंड-प्रकारची फ्रेम, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ॲबसॉर्बर आहेत. ब्रेकिंगसाठी, दोन्हीमध्ये 240mm फ्रंट डिस्क आणि 130mm मागील ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत, तसेच सीबीएस सिस्टीम देखील दिली आहे. एसपी 125 चा मागील टायर (100/80-18) शाइन 125 (90/90-18) पेक्षा रुंद आहे. रुंद टायरमुळे एसपी 125 ला रस्त्यावर उत्तम पकड आणि स्थिरता मिळते.
वजन आणि टाकीची क्षमता
एसपी 125 वजनाने (117 किलो) शाइन 125 (113 किलो) पेक्षा 4 किलो जास्त आहे, पण अधिक पॉवरफुल इंजिनमुळे हे वजन जाणवत नाही. इंधन टाकीच्या क्षमतेतही थोडा फरक आहे; शाइन 125 मध्ये 10.5 लीटरची टाकी आहे, तर एसपी 125 मध्ये 11 लीटरची टाकी आहे.
तंत्रज्ञान आणि फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत एसपी 125 स्पष्टपणे पुढे आहे. शाइन 125 मध्ये गियर पोझिशन, मायलेज आणि डिस्टेंस-टू-एम्प्टी दाखवणारे डिजिटल कन्सोल आहे. तर, एसपी 125 मध्ये फुल डिजिटल टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि मेसेज अलर्ट, तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते, ज्यामुळे ती अधिक प्रीमियम वाटते. सायलेंट स्टार्ट/स्टॉप सिस्टीम आणि यूएसबी चार्जर हे फीचर्स दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत.
किंमत आणि निष्कर्ष
- होंडा शाइन 125 डिस्कची एक्स-शोरूम किंमत: 82,898 रुपये
- होंडा एसपी 125 DLX ची एक्स-शोरूम किंमत: 93,152 रुपये
एसपी 125 ची किंमत शाइन 125 पेक्षा जवळपास 11,000 रुपये जास्त आहे. जर तुम्हाला जास्त फीचर्स, स्पोर्टी डिझाइन आणि उत्तम स्थिरता हवी असेल, तर एसपी 125 निवडणे फायदेशीर आहे. परंतु, जर तुमचा मुख्य उद्देश उत्तम मायलेज, कमी किंमत आणि विश्वासार्हता असेल, तर शाइन 125 हाच उत्तम पर्याय आहे.
हे देखील वाचा – Marathi Language Viral Video : विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..









