Bhide Bridge Pune : दिवाळीसाठी खुला केलेला भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, येथील पादचारी पुलाचे काम डिसेंबरच्या शेवटच्या आठ्वड्यापर्यंत पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दिवाळीसाठी उघडलेला हा भिडे पूल यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतू आता दिवाळी संपल्यानंतर हा पूल पुन्हा एकदा बंद करण्यात आल्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी कायम राहणार असल्याचे चित्र आता दिसत आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून बाबाराव भिडे पुलावर पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू असल्याने, दिवाळीच्या काळात तात्पुरता खुला करण्यात आलेला हा पूल आता पुन्हा बंद करण्यात आला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याने, हा पूल नव्या वर्षातच नागरिकांसाठी खुला होईल, असे दिसते.
महामेट्रोच्या डेक्कन स्थानकापासून नारायण पेठ आणि सदाशिव पेठ परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वरील बाजूस पादचारी पूल बांधणीचे काम सुरु आहे. या कामासाठी गेल्या काही महिन्यांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र दिवाळीत होणारी लक्षणीय गर्दी पाहता ११ ऑक्टोबरपासून पूल सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वाहतुकीस खुला करण्यात आला होता.
महामेट्रोच्या म्हणण्यानुसार, या पादचारी पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड लोखंडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पूल बंद ठेवणे हाच एक योगय पर्याय आहे. हे काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, वाहनचालकांना आणि नागरिकांना डिसेंबर नंतरच या पुलावरून पुन्हा प्रवास करता येईल.
दरम्यान, या पादचारी पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही काळापासून सुरू असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मेट्रो प्रशासनाचा विचार असून त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहान त्यांनी दिले आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss 19 : बिग बॉस १९ मधून ‘नेहल चुडासमा’सह ‘बसीर अली’ बिग बॉसच्या घराबाहेर?









