Ranjeetsingh Nimbalkar -फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या आणि त्यांनी पोलीस निरीक्षक, खासदार, त्यांचे दोन खासगी सचिव यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सातार्यात खळबळ माजली आहे. डॉ. संपदा यांनी हातावर मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात 31 जुलै 2025 या दिवशी खासदारांशी बोलणे झाले, त्यांचे दोन खासगी सचिव आले होते असे लिहिले आहे. त्या काळात भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) हे खासदार होते, त्यांच्या बरोबर सतत असणारे दोघे सचिवही भाजपाचेच आहेत. मात्र आत्महत्येला 24 तास उलटून गेल्यावरही पोलिसांनी रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या सचिवांची साधी जबानी घेतलेली नाही. या दोन्ही सचिवांनी फोन बंद ठेवले आहेत.
डॉ. संपदा मुंडे हिने चिठ्ठीत माननीय खासदार व त्यांचे दोन पीए असा उल्लेख केला आहे. ती घटना घडली तेव्हा नाईक-निंबाळकर खासदार होते. सध्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील हे खासदार आहेत. त्यांनी नाईक-निंबाळकर यांचा पराभव केला होता. नाईक-निंबाळकरांचे नाव चर्चेत आल्यावर त्यांनी आरोप फेटाळत म्हटले की, हे गलिच्छ राजकारण सुरू आहे. काहीही झाले की, निंबाळकर कुटुंबाचे नाव घेतले जाते. हे प्रकरण इतके चर्चेत असताना उदयनराजे भोसले यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण ते गेले अनेक दिवस आजारी आहेत.
दरम्यान, पोस्ट मॉर्टेमचा अहवाल बदलणे किंवा आरोपीचा वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी दबाव आणणे हे प्रकार सातारा जिल्ह्यात काही काळापासून सर्रास सुरू आहेत, अशी चर्चा आहे. मात्र या प्रकारांविरुध्द कुणीही आवाज उठवत नव्हते. एका घटनेत बालविवाह केला म्हणून अनेक आरोपींना पकडल्यानंतर पुजार्यानेच बालविवाहावेळी उपस्थित नसल्याचे सांगितले होते. आणखी एका प्रकरणातील आरोपीला रात्री साडेआठ वाजता जामीन देण्यात आला. याबाबत आरडाओरड झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली. सातारा जिल्ह्यात हे प्रकार सामान्य असल्याचे सांगितले जाते.
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटणला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर आदि उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.या प्रकरणात इंजिनिअर प्रशांत बनकरला आज अटक करण्यात आली. त्याला पुणे परिसरातील एका फार्म हाऊसमधून अटक करण्यात आली, असे सांगितले जात होते. मात्र प्रशांतच्या बहिणीने त्याला घरातूनच अटक केल्याचे सांगितले. डॉ. संपदाच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यावर प्रशांत घाबरला होता. खूप तणावात असल्याने तो घरातून निघून गेला होता. त्याला आम्ही समजावून घरी बोलावले. आज सकाळी तो घरी परतल्यावर आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीस घरी येऊन त्याला घेऊन गेले. त्याला आज अतिरिक्त जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
प्रशांतला अटक झाली असली तरी पोलीस निरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार आहे. त्याचे अखेरचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे असल्याची माहिती मिळाली आहे. तो मूळचा बीडच्या परळीचा आहे. यामुळे पंढरपूर व बीड येथे त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान आज डॉ. संपदा मुंडे यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी केली आहे. कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय निवासी डॉक्टर संघटनेने दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात फलटण येथील पोलीस उपअधीक्षकांना निवेदन दिले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. जय भगवान प्रतिष्ठान या संस्थेनेही महिला आयपीएस अधिकार्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून तपास करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. डॉ. संपदाची बहीण म्हणाली की, मागच्या महिन्यात ती माझ्याशी बोलली होती. तेव्हा तिने शवविच्छेदनसाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचे सांगितले होते. अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठीही दबाव होता. तिने याला नकार दिला होता, तेव्हापासून तिला त्रास सुरू झाला. त्यानंतर तिच्यावर चौकशी लावली. तिने तक्रार केली. त्यात आत्महत्या करेन, असेही लिहिले होते. पाच महिन्यांआधी सर्व काही माहिती असताना प्रशासनाने कारवाई का केली नाही? तिने शिक्षणासाठी घेतलेले कर्ज अजून फिटलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते उबाठाचे अंबादास दानवे यांनी आज या प्रकरणावरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आरोप केले. अंबादास दानवे म्हणाले की, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक या दोन स्वीय सहाय्यकांनी रुग्णालयात येऊन डॉक्टर तरुणीला त्यांच्या माजी खासदारांशी फोनवरून बोलणे करून दिले. त्यामुळे निंबाळकर यांच्यावर सहआरोपी म्हणून कारवाई केली जावी. तर डॉ. संपदाच्या पत्रात उल्लेख असलेल्या अनिल महाडिक याची पदोन्नती झाली आहे. तो आता नंदुरबार येथे पोलीस उपअधीक्षक आहे. महाडिक हे माजी खासदारांचे दलाल असल्याने स्थानिक शेतकर्यांवर गैरवापर आणि बोजा लादण्यात तो सहभागी होता. वाठार निंबाळकर आणि वाखरी या गावातील शेतकर्यांवर 1 कोटी रुपयांचा खोटा बोजा लादण्यात आला. अभिजित निंबाळकर यांनी सत्तेचा माज दाखवून हे केले आहे. बीडमधील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात उडी घेतली. ते म्हणाले की, याप्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांची तक्रार न घेणारे सर्व संबंधित अधिकार्यांना या प्रकरणात आरोपी करा. आम्ही बीडचे आहोत म्हणून आम्हाला कोणी हिणवत असेल तर ते बरोबर नाही. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात यावी.
उबाठा खासदार संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आल्यापासून त्यांचे लक्ष कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा याकडे नाही. गृहखात्याचा कारभार अत्यंत असंवेदनशीलपणे सुरू आहे. गृहखात्याचे फक्त विरोधकांवर पाळत ठेवणे, त्यांचे फोन टॅप करणे, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणे हेच सुरू आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करावा, याकडे आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणारे गुन्हेगार हे पोलीस खात्यातील आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत, तरी महिला सुरक्षित नाही. आता त्या सर्व महान नेत्या कुठे गेल्या? इतर कोणाचे सरकार असते तर महिलांवरील हल्ले, अत्याचार, खून याविरोधात या महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केले असते, मग आता त्या गप्प का आहेत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी आज आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हे खूपच गंभीर प्रकरण आहे. एक तरुण डॉक्टर स्वत:च्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते ही एक दु:खद गोष्ट आहे. सरकारने कालच संबंधित पोलीस अधिकार्याला निलंबित केले आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. या प्रकरणात विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही खूप चुकीचे आहे. इतक्या संवेदनशील प्रकरणात, राजकीय पोळी भाजण्याचे काम करणे ही असंवेदनशीलता आहे.
डॉ. संपदा मानसिकदृष्ट्या विचलित
प्रशांत बनकरच्या कुटुंबियांचा दावा
प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी आज त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले. प्रशांतच्या बहिणीने धक्कादायक माहिती देताना सांगितले की, डॉ. संपदा ही आमच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती. या घरात फक्त आमचे आई-वडील राहतात. आम्ही तिघी बहिणी आणि दोन भाऊ इथे राहत नाही. भाडेकरू असल्याने तिचे आमच्या घरात येणे-जाणे होते. आमच्या सगळ्या कुटुंबियांशी तिचे अतिशय चांगले संबंध होते. माझी आई तिला मुलीसारखी मानायची. माझेही तिच्याशी बहिणीसारखे संबंध होते. त्यांच्या सगळ्याच कुटुंबाचे आमच्याशी चांगले संबंध होते. म्हणून दोन्ही कुटुंब एकदा शिंगणापूर येथे देवदर्शनालाही गेले होते. प्रशांत पुण्यात असतो. त्याचा आणि डॉ. संपदा यांचा फारसा संबंध आला नव्हता. मध्यंतरी त्याला डेंग्यू झाला असताना तो घरी येऊन उपचार घेत होता. त्यावेळी त्यांच्यातील ओळख वाढली होती. प्रशांतला ती दादा बोलायची. पंधरा दिवसांपूर्वी डॉ. संपदाने त्याला अचानक प्रपोझ केले. त्याने स्पष्ट शब्दांत त्याला नकार दिला. त्यानंतर तो डॉ. संपदाशी बोलतही नव्हता. दिवाळीसाठी तो घरी आला होता. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळी डॉ. संपदाही आली होती. तिने पूजा केली. रांगोळी काढली. त्यावेळी प्रशांतने सर्वांचे फोटो काढले. ते संपदाला आवडले नाहीत. तिने इतके वाईट फोटो काढले, असे म्हणत प्रशांतला बडबडायला सुरुवात केली. त्यावर त्याने मॅडम असे बोलू नका, एवढेच म्हटले. यानंतर संपदा त्याच्यावर चिडली. तिने तू असे कसे बोललास. मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे, असे त्याला म्हटले. त्यानंतर माझा भाऊ मित्राकडे निघून गेला. त्यानंतर संपदाने त्याला सतत फोन केले. त्याने झाल्या प्रकाराबद्दल तिची माफीही मागितली. परंतु संपदा त्याला फोन करून त्रास देतच होती. गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती. ते तिच्या बोलण्यातून जाणवत होते. तिला काही विचारले की, असंबंधद्ध बोलायची. मला कामाचे खूप टेन्शन आहे, असे सांगायची. कसले टेन्शन आहे, हे मात्र सांगायची नाही. प्रशांतचा तिच्याशी कुठलाही संबंध नव्हता. प्रशांत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता, असे तिने म्हटले आहे. परंतु तीच प्रशांतला वारंवार फोन करून टॉर्चर करत होती. आमच्या कुटुंबातही त्यांच्या लग्नाविषयी कधी चर्चा झाली नाही. आमच्या मनात तसे कधीही आले नाही. आम्ही ही सगळी माहिती पोलिसांना दिली आहे. त्याचे रेकॉर्डिंग पोलिसांना मिळू शकेल. प्रशांतची आई म्हणाली की, माझा मुलगा पुण्याला असतो. दिवाळीमुळे तो चार पाच दिवसांपासून घरीच होता. त्याच्यावर मुद्दामून असे आरोप करण्यात आले आहेत. तो असे करणार नाही. त्या महिला डॉक्टराच्या हातावर जे नाव लिहिले आहे, ते तिनेच लिहिले आहे का? की दुसर्या कुणी नाव तिच्या हातावर लिहिले आहे, याचा तपास झाला पाहिजे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
राम मंदिराचे काम पूर्ण झाले; मोदी धर्मध्वज फडवकणार









