Aditya thackeray- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackera)आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya thackeray)यांनी आज वरळीच्या एनएससीआय डोममध्ये निर्धार मेळावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचे नाव न घेता त्यांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केला, तर आदित्य ठाकरे यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वरळी मतदारसंघातील मतदारयाद्यांच्या घोळाचा एकामागून एक पाढा वाचत निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला केला. मुंबईतील मतदारयाद्यांचे उद्यापासून वाचन आणि तपासणी करण्याचे आदेशही उबाठा शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपगटप्रमुखांना दिले.
निर्धार मेळाव्यात ‘बोगस सरकार बोगस मतदार’ या शीर्षकासह सादरीकरण करून आदित्य यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याप्रमाणेच मतदार याद्यांमधील घोळाचा पर्दाफाश केला. त्यांनी सांगितले की, वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी 2,52,970 मतदार होते. विधानसभा निवडणुकीत ते 2,63,352 झाले. म्हणजेच काही महिन्यात 16,043 मतांची वाढ झाली. या यादीतून 5 हजार 661 नावे वगळण्यात आली. मतदार यादीचे सखोल वाचन केल्यानंतर 19 हजार 333 मतदारांच्या माहितींमध्ये गडबड असल्याचे आढळून आले. मतदाराचे नाव आणि वडिलांचे नाव एकच असलेले 502 मतदार, मतदाराचे आडनाव आणि वडिलांचे आडनाव वेगळे असलेले 720 पुरूष मतदार आहेत. 643 महिला मतदारांचे लिंग पुरुष नोंदवण्यात आले आहे. एकच ईपिक क्रमांकासह दोनदा मतदार यादीत नावे असलेले 133 मतदार आढळले. 28 मतदारांच्या मतदान कार्डावर ईपिक नंबर नाहीत. 100 वर्षांहून अधिक वय असलेल्या 113 व्यक्ती आहेत. पण एका मतदाराचे 2000 साली निधन झाले, तर एकजण 1985 सालीच मृत झाला आहे. अशी किती उदाहरणे आहेत. त्यांच्या नावावर मतदान केले जात आहे. वरळी मतदारसंघात 4,177 लोकांचा काहीही ठावठिकाणा नाही. त्यांची मतदारयाद्यांत नावे आहेत. 67 मतदार असे आहेत, ज्यांच्या घराचा पत्ता फक्त झो झो झो आहे. एका ठिकाणी एकाच लहानशा खोलीत 38 मतदार असल्याचे दाखवण्यात आले. या घरात चौकशी केली असताना त्यातील एकही मतदार तिथे राहत नाही. वरळीत अशी 214 घरे आहेत, ज्यात 3,335 मतदार राहत आहेत. काही मतदान कार्डांवर मतदारांचा चेहराच स्पष्ट दिसत नाही. काही कार्डांवर मतदाराचे फोटोत फक्त नाक दाखवण्यात आले आहे. याद्या अचूक ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. पण ते सध्या भाजपाचे काम करत असल्याने आयोगाचे काम आपण करूया. याद्या नीट तपासूया.
वरळी मतदारसंघातील एका घराचा व्हिडिओही आदित्य ठाकरे यांनी दाखवला. या छोट्याशा घराच्या पत्त्यावर 46 मतदार नोंदणीकृत असले तरी प्रत्यक्षात पडताळणी केल्यानंतर यापैकी एकही मतदार तिथे राहत नसल्याचे आढळले, अशी माहिती त्यांनी दिली.
आदित्य म्हणाले की, वरळीतील गडबड असणार्या मतदारांची संख्या 22 ते 23 हजार असू शकते. हा कमीत कमी आकडा आहे.अजून यादीचे वाचन सुरू आहे. शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपगटप्रमुखांची ही जबाबदारी आहे. आता 1,200 लोकांची मतदारयादी असणार आहे. या यादीचा अभ्यास करावा लागणार आहे. हे आपल्याला यादी वाचूनच कळते. तुम्ही पोलिंग एजंट म्हणून बसाल, त्यावेळी काय पाहाल? एका फोटोमध्ये फक्त नाक दाखवले आहे. तुम्हाला फोटो ओळखता आला पाहिजे.
अॅनाकोंडाचे पोट फाडून बाहेर येईन
या मेळाव्यात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच एकजण मुंबईत येऊन गेला. आज काय योगायोग आहे, माहीत नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. एक म्हणजे भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन आणि दुसरी जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार. आता आम्ही पेंग्विन आणले म्हणून लाखो पर्यटक वाढले, याचा मला अभिमान आहे. त्यावरून काही पेंग्विनच्या उंचीची आणि बुद्धीची माणसे आमच्यावर टीका करतात. ते सोडून द्या. पण अॅनाकोंडा म्हणजे गिळणारा साप. त्यांना मुंबई गिळायची आहे. बरे कशी गिळतोस तेच बघतो. नाही तुझे पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही. घराणेशाही कोणाची? ठाकरेंची? अरे उभा राहून दाखव समोर. म्हणून मला त्या अब्दालीला सांगायचे आहे की, आम्ही आमच्या आईवडिलांचे ऋण मानणारे पाईक आहोत. वारसदार आहोत. संजय राऊत म्हणाले, तशी ब्रह्मचार्यांची पिलावळ नाही. तुम्हा ब्रह्मचार्यांना 40 पोरे झाली कशी? मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. तशी परिस्थिती भाजपाची झाली आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
१०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी
मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक









