Sachin Chandwade Suicide: मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘जामतारा – सबका नंबर आयेगा सीझन 2’ मध्ये दिसलेला प्रतिभावान मराठी अभिनेता सचिन चांदवडे याचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे.
त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असून, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कलाविश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे या मूळगावी राहणारा सचिन चांदवडे याने 23 ऑक्टोबर रोजी पुणे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये छताच्या पंख्याला गळफास लावून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्वरित त्याला खाली उतरवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला त्याच रात्री पुढील उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पण, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 ते 1:30 च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अभिनय आणि अभियांत्रिकीची दुहेरी कारकीर्द
अभिनेता सचिन चांदवडे हा मूळचा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर देखील होता. तो पुण्याच्या आयटी पार्कमध्ये नोकरी करत होता. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने नोकरी सांभाळून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
‘जामतारा सीझन 2’ मधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. याशिवाय तो ‘विषय क्लोज’ नावाच्या चित्रपटातही दिसला होता. तो गणेशोत्सव आणि गुढीपाडव्याला ढोल-ताशा पथकात सक्रियपणे ढोलवादनात सहभागी व्हायचा.
आगामी प्रोजेक्टचे शूटिंग केले होते पूर्ण
सचिनने नुकतेच ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते, यात तो मुख्य भूमिकेत दिसणार होता. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्याने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते आणि तो याबद्दल खूप उत्साही दिसत होता. त्यामुळे या महत्त्वाच्या टप्प्यावर त्याने हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, त्याच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.









