The Family Man 3: अभिनेता मनोज वाजपेयीची ओटीटीवरील सर्वाधिक गाजलेली आणि लोकप्रिय वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सीझनची उत्सुकता अखेर संपली आहे. या सुपरहिट स्पाय थ्रिलर सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून, तब्बल 4 वर्षांनंतर श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.
प्रदर्शनाची तारीख आणि ओटीटी प्लॅटफॉर्म:
‘द फॅमिली मॅन 3’ ही सीरिज 21 नोव्हेंबर 2025 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
टीझरमधील मनोरंजक क्षण:
प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर ‘ले लाडले, हो गया श्रीकांत का कमबॅक’ असे लिहीत एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रीकांत तिवारीची पत्नी सूची गेल्या 4 वर्षांतील बदल सांगताना दिसते. ती म्हणते, “धृती आता कॉलेजमध्ये गेली आहे आणि अथर्वने बॅलन्स शिकायला सुरुवात केली आहे, तर आपले लाडके तिवारी जी 4 वर्षांपासून एकाच गोष्टीच्या मागे लागले आहेत.”
यानंतर मनोज वाजपेयी ‘आsss’ असा आवाज काढताना दिसतात. तो कांदा कापताना, गुळण्या करताना किंवा संगीत शिकतानाही तोच आवाज काढत असतो. श्रीकांतच्या या आवाजाला कंटाळून त्याचा सहकारी जे.के. त्याच्या तोंडात वडापाव कोंबतो आणि विचारतो, “चार वर्षांपासून तुझं हे ‘आsss’ सुरू आहे, काय आहे हे?” यावर श्रीकांत त्याच्या खास शैलीत उत्तर देतो, “आss रहा हूँ में…” आणि व्हिडिओ संपतो.
राज आणि डीके या दिग्दर्शक जोडीच्या D2R Films बॅनरखाली या सीरिजची निर्मिती झाली आहे. या सीझनमध्ये मनोज वाजपेयीसोबत प्रियामणी, शारिब हाशमी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरी आणि गुल पनाग हे जुने कलाकार पुन्हा दिसणार आहेत.
यावेळी अभिनेता जयदीप अहलावत आणि अभिनेत्री निमरत कौर यांची दमदार एंट्री होणार आहे. हे दोघेही नकारात्मक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या सीझनमध्ये देशाच्या सीमांपलीकडील आणि अंतर्गत संकटांशी झुंज देत श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा कर्तव्य पार पाडताना दिसेल.
हे देखील वाचा – Aircraft Manufacturing: आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल; भारतात पहिल्यांदाच होणार प्रवासी विमानाची निर्मिती









