Home / देश-विदेश / Amazon Layoffs : एकाचवेळी ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात? मोठ्या टेक कंपन्या करतायत कर्मचारी कपात….

Amazon Layoffs : एकाचवेळी ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात? मोठ्या टेक कंपन्या करतायत कर्मचारी कपात….

Amazon Layoffs : आता मेटा पाठोपाठच ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अमेझॉनने सुद्धा मेटासारखाच पवित्र हाती घेतला आहे. अमेझॉनने आपल्या...

By: Team Navakal
Amazon Layoffs

Amazon Layoffs : आता मेटा पाठोपाठच ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अमेझॉनने सुद्धा मेटासारखाच पवित्र हाती घेतला आहे. अमेझॉनने आपल्या ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी नोकरकपात असल्याचे बोलले जात आहे.अमेझॉनच्या या मोठ्या आणि भयानक निर्णयाने टेक क्षेत्रात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

जवळ जवळ ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे हि छोटी बाब नाही. हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागत असल्याने प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, कंपनी जवळपास सर्व विभागांमधून ३०,००० पर्यंत कॉर्पोरेट पदांची कपात करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे.
जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या अमेझॉन या कंपनीत एवढी मोठी कपात का केली जात आहे, याबद्दल कर्मचारी आणि उद्योग निरीक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता निर्माण झाली आहे. काही वृत्तानुसार, प्रभावित कर्मचाऱ्यांना काल पासून सकाळपासूनच ईमेलद्वारे सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण; ॲमेझॉनने या अहवालांवर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

ॲमेझॉनच्या निर्णयाचा परिणाम कोणत्या विभागांवर होणार?
काही खास वृत्तांनुसार ॲमेझॉनमधील कर्मचारी कपातीच्या या निर्णयामुळे मानवी संसाधन (People Experience and Technology), ऑपरेशन्स, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, तसेच डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस यांसारख्या विविध विभागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून ईमेल पाठवले गेल्याची जाण्याची शक्यता आहे.

ॲमेझॉनचा जागतिक कर्मचारीवर्ग सुमारे १.५४ दशलक्ष (१५ लाख ४० हजार) इतका आहे. त्यापैकी बहुतेक कर्मचारी वेअरहाऊसेसमध्ये काम करतात; तर सुमारे ३,५०,००० कर्मचारी कॉर्पोरेट पदांवर कार्यरत आहेत आणि याच श्रेणीला या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका बसणार असलायची शक्यता वर्तवली जात आहे.

मागच्या दोन वर्षांत ॲमेझॉनने अनेक वेळा कर्मचारी कपात केली आहे. त्यामध्ये कम्युनिकेशन्स, डिव्हाइसेस व पॉडकास्टिंग यांसारख्या विभागांमधील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. २०२२ च्या उत्तरार्धापासून ते २०२३ पर्यंत सीईओ अँडी जस्सी यांच्या देखरेखीखाली कंपनीची सर्वांत मोठी कर्मचारी कपात या आधी केली गेली होती, ज्यामध्ये कॉर्पोरेट पदांवरील तब्बल २७,००० इतके कर्मचारी कमी करण्यात आले होते.

या वर्षी नोकरकपात करणारी ॲमेझॉन ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एकटीच मोठी कंपनी नाही आहे तर ; काही वृत्तांच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण उद्योग क्षेत्रात २०० हून अधिक तंत्रज्ञान कंपन्यांनी २०२४ मध्ये एकत्रितपणे सुमारे ९८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे समोर आले आहे. मायक्रोसॉफ्टने आतापर्यंत सुमारे १५,००० कर्मचाऱ्यांना, तर मेटाने अलीकडेच त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागातील सुमारे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गूगलनेही या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या क्लाउड युनिटमधील १०० हून अधिक डिझाईनशी संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याचे वृत्त आहे.

मागच्या वर्षात देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली होती. परंतु, वाढती महागाई आणि वाढत्या व्याजदरांमुळे २०२३ हे वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सर्वाधिक कठीण गेले असल्याचे दिसून आले. या काळात जवळपास १,२०० कंपन्यांनी २,६०,००० हून अधिक नोकऱ्यांमध्ये कपात करण्यात आली होती.

तंत्रज्ञान उद्योगात कपातीची मोठी लाट येण्यामागे फक्त एकच कारण कारणीभूत नाही. तर यात अनेक बाबी जवाबदार आहेत. धोरणात्मक, आर्थिक आणि रचनात्मक बदलांचे एकत्रित परिणाम यात दिसून येतात त्यामुळे यात कुठल्याही प्रकारची लयबद्धता तसेच कामाचे सतत हलणारे नियोजन सुद्धा याला तितकेच कारणीभूत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये साथीच्या रोगादरम्यान मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल मागणी विक्रमी उच्चांकावर राहील या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करण्यात आली. परंतु, त्यांचे अंदाज सपशेल चुकीचे ठरले आणि विकासाचा वेग मंदावला गेला, ज्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये वाजवीपेक्षा जास्त अतिरिक्त कर्मचारी झाले. त्यामुळे त्यांच्या प्रॉफिट मार्जिनवर अधिक दबाव पडला. परिणामी यामुळे नोकरकपातीला सुरुवात झाली. पण यात त्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची काय चूक? सुरवातीला अपेक्षेने भावनेच्या भारत इतके जास्त कर्मचारी कंपनीने कामावर घेतले आणि आता सर्रास कर्मचारी कपात करणे सुरु आहे. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहेत त्यांच्या कुटुंबच काय? पुढे त्यांना नोकरी कोण देणार? बर इतक्या नामांकित कंपनीने काढून का टाकले यामुळे पुढे नोकरी मिळेल कि नाही असा रोष आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

तसेच, कंपन्या त्यांचे लक्ष आणि निधी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन आणि क्लाउड कॉम्प्युटिंग तसेच डेटा इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या उच्च-विकास क्षेत्रांकडे मागच्या काही काळापासून वळवत आहेत. ॲमेझॉनचे सीईओ जस्सी यांनी जूनमधील एका मेमोमध्ये हे मान्य देखील केले होते की, कंपनीच्या जनरेटिव्ह एआयच्या स्वीकृतीमुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची दाट शक्यता आहे. “कालांतराने या बदलाचा नेमका परिणाम काय होईल हे सांगणे तसे कठीणच; परंतु येत्या काही काळात यामुळे आमच्या एकूण कॉर्पोरेट कर्मचारीसंख्येत झपाट्याने घट होईल, अशी शक्यता आहे,” असेही जस्सी पुढे म्हणाले.

दरम्यान, अ‍ॅमेझॉननं जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीची घोषणा मंगळवारीच जरी केली असली, तरीही भारतात कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये यासंदर्भातील सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात कंपनीच्या बंगळुरूमधील पीएक्सटी अर्थात People Experience and Technology टीमनं तशा सूचना प्राप्त झाल्याची माहिती देखील काही वृतांना दिली आहे.


हे देखील वाचा – Meta is Firing 600 Employees : एआय नोकऱ्यादेखील धोक्यात?६०० कर्मचाऱ्यांना मेटाने दिला नारळ!

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या