Home / देश-विदेश / Artificial Rain : दिल्लीत कृत्रिम पावसावर राजकारण का?कृत्रिम पाऊस नेमका कसा पडतो..

Artificial Rain : दिल्लीत कृत्रिम पावसावर राजकारण का?कृत्रिम पाऊस नेमका कसा पडतो..

Artificial Rain : हवामान कुठली असो दिल्लीच असो किंवा महाराष्ट्राचं ते आपण कस ठेवतो यावर निर्भर असत. हवामानाचा दर्जा घसरायला...

By: Team Navakal
Artificial Rain

Artificial Rain : हवामान कुठली असो दिल्लीच असो किंवा महाराष्ट्राचं ते आपण कस ठेवतो यावर निर्भर असत. हवामानाचा दर्जा घसरायला फक्त दिवाळी हेच एक कारण नाही आहे. यात असंख्य कारण आहेत. मग ते वाहनामुळे होणार प्रदूषण असो किंवा दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे होणार प्रदुषण असो. दोन्हीची तीव्रता आधीच म्हणावी लागेल.

यात दरवर्षी प्रमाणे हिवाळ्यात दिल्लीच्या हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात ढासळलेली असते. धुरके आणि प्रदूषित हवेमुळे सर्वसामान्यांना श्वास घेणेही मुश्किल होऊन जाते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कृत्रिम ढगांनी पाऊस पाडण्याचा अनोखा प्रयत्न केला जात आहे.पण नवल म्हणजे यातही राजकारण उफाळून निघालं आहे. २८ ऑक्टोबरला दोन वेळा क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्यात आला होता. पण २९ ऑक्टोबरला मात्र पावसाचा एक थेंब देखील पडला नाही आणि आधीच शंकाकुशंकांनी घेरलेला हा प्रयोग मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडला.

दिल्लीत कृत्रिम पावसाची गरज काय?

खर तर हिवाळा असो किंवा पावसाळा असो अथवा असो उन्हाळा हवेची गुणवत्ता हि कायमच ढासळलेलीच असते. पण हिवाळ्यात याला काही पारावारच उरत नाही. दर हिवाळ्यात दिल्लीच्या हवेची गुणवत्ता हि बाकीच्या ऋतुंपेक्षा अधिक प्रमाणात ढासळलेली असते. काही किलोमीटर अंतरापर्यंत धुरके सर्वत्र पसरलेले असते. समोरचे काही दिसायला मार्गच उरत नाही. सामान्यांनाही श्वसनाचा त्रास होतो. आणि काहींना आधीच श्वसनाचे विकार आहेत, त्यांची परिस्थिती तर याहून वाईट असते. वाहनांना दाट धुरकट हवेमुळे समोरचे दृश्य बघण्यास अडसर येतो. यामुळे अनेक उड्डाणे देखील रद्द करावी लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आयआयटी कानपूरशी यावर्षी सप्टेंबरमध्ये एक सामंजस्य करार देखील केला. कृत्रिम पाऊस पाडून हवेचे प्रदूषण कमी करण्याचा तसेच हवेची गुणवत्ता अधिक उत्तम व्हावी हा या करारा मागचा मानस आहे. या प्रयोगाला अनेक दिवस काही करणास्तव मुहूर्त मिळत नव्हता. अखेर आयआयटी कानपूरने त्यांच्या सेस्ना २०६एच विमानाने २८ ऑक्टोबर रोजी क्लाऊड सीडिंग केलेच. या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा खर्च अंदाजे साडेतीन कोटी रुपये इतका आहे.

कृत्रिम पाऊस जर पडायचा असेल तर त्यासाठी कृत्रिम ढग तयार केले जातात. या प्रक्रियेला ‘क्लाऊड सीडिंग’ असे म्हटले जाते. क्लाऊड सीडिंगमध्ये सामान्यतः सिल्व्हर आयोडाइड किंवा सोडियम क्लोराइडसारखी संयुगे ढगांमध्ये विमानातून फवाऱ्यांद्वारे सोडण्यात येतात, ज्यामुळे पाण्याचे थेंब त्यांच्यावर गोठून राहतात आणि पाऊस किंवा बर्फ तयार करतात. हे कमी धोकादायक असले तरी देखील, सतत वापरल्यास हे घटक जमिनीत आणि पाण्यात साचतात. त्यामुळे शेती, परिसंस्था आणि मानवी आरोग्यावर याचे दीर्घकालीन दुष्परिणाम काय होतील हे स्पष्ट झालेले नाही.

क्लाऊड सीडिंगसाठी सगळ्यात जास्त गरज असते ती नैसर्गिक ढगांची आणि ढग असले तरी, या प्रक्रियेमुळे पावसाचे प्रमाण निश्चितपणे वाढतेच असा ठोस पुरावा नाही. शिवाय याहून महत्त्वाचे म्हणजे पाऊस पडलाच आणि हवा स्वच्छ झालीच तरी त्याचा परिणाम दोन दिवसाहुन अधिक ठिकून राहीलच याची काही हमी नाही. याच कारणामुळे हा प्रयोग आता जोरदार वादात सापडला आहे. आधीच वृक्षतोड, वायू, जलप्रदूषणासारख्या प्रचंड मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गचक्र अधिका अधिक बिघडत असतानाच असा निसर्गाशी छेडछाड करणारा प्रयोग का करायचा, तो करण्यासारखी परिस्थिती सध्या आहे का, याहून काही दुरसे उपाय नाहीत का? असे प्रश्न विरोधक शिवाय तज्ज्ञांकडून उपस्थित केले जात आहेत.

आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी विमानाद्वारे दिल्लीत बुराडी, उत्तर करोल बाग आणि मयूर विहार अश्या काही भागांमध्ये मंगळवारी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी क्लाउड सीडिंग प्रक्रिया राबली. परंतु त्याचा काही फारसा परिणाम दिसला नाही. प्रयोगानंतर पाऊस पडलेलाच नाही, त्यामुळे प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला याचा असा अर्थ होत नाही. एक कारण असेही आहे की प्रयोग केला तेव्हा आर्द्रता केवळ १५-२० इतकी होती. इतक्या कमी ओलाव्यात पावसाची शक्यता प्रचंड कमी असते.

भारतीय हवामान खात्याच्या अधिक माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर हा मान्सूननंतरचा काळ असतो. तेव्हा नैर्ऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरलेला असतो. हिवाळ्यात बहुतेक काळ हवा प्रचंड कोरडी आणि स्थिर असल्याने पाऊस पडण्यास सुविधाजनक अशी परिस्थिती नसते. अधूनमधून जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तो प्रामुख्याने ‘वेस्टर्न डिस्टर्बन्सेस’ म्हणजेच पश्चिमेकडील चक्राकार वाऱ्यांमुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे पडला जातो.

याशिवाय प्रदूषणावर कृत्रिम पाऊस ही लॉंगलास्टिंग अशी उपाययोजना नाहीच, असे हि काही तज्ज्ञ सांगतात. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करणाऱ्या आयआयटी कानपूरच्या संचालकांचेही सारखेच मत आहे. हवेच्या प्रदूषणाची मात्रा प्रचंड प्रमाणात वाढल्याने हा प्रयोग करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

दिल्लीमध्ये याआधी हि दोन वेळा असे प्रयोग झाल्याची माहिती आयआयटीएम, पुणेच्या अहवालात देण्यात आली आहे. पहिल्यांदा १९५७ साली हा कृत्रिम पावसाचा कदाचित पहिला प्रयोग झाला होता. त्यानंतर १९७१-७२ मध्ये हिवाळ्यात हा प्रयोग केला गेला होता. ७० च्या दशकातील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने हा प्रयोग केला होता. आता पुन्हा ५३ वर्षांनंतर परत एकदा हा प्रयोग दिल्लीत होत आहे.

महाराष्ट्रात २०१७-१९ च्या दरम्यान सोलापूरमध्ये देखील असा कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. या दोन वर्षांत २७६ ढगांवर अभ्यास करून क्लाऊड सीडिंग देखील करण्यात आली होती. यामुळे काही भागांत ४८ टक्क्यांपर्यंत पाऊसमान वाढल्याचा दावा सरकारने केला होता. कर्नाटकात २०१२, २०१७, २०१या काळात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तसेच आंध्र प्रदेश २००३, २०१६ या वर्षात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला.

जागतिक स्तरावर आतापर्यंत ५६ हून अधिक देशांमध्ये कृत्रिम पाऊस पडण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. यात ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया, थायलँड, यूएई आणि अमेरिका या देशांचा देखील समावेश आहे. पण दिल्लीच्या या कृत्रिम पावसावर विरोधकांकडूनं मात्र ताशेरे ओढले जात आहे.


हे देखील वाचा –

TRAI चा मोठा निर्णय! Truecaller ची गरज संपली; आता कॉल करणाऱ्याचे ‘खरे नाव’ फोन स्क्रीनवर दिसणार

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या