Home / महाराष्ट्र / Maharashtra Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ करणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली

Maharashtra Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ करणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली

Maharashtra Farmers Loan Waiver: नागपूरमध्ये प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’च्या आंदोलनावर अखेर...

By: Team Navakal
Maharashtra Farmers Loan Waiver

Maharashtra Farmers Loan Waiver: नागपूरमध्ये प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’च्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीउशिरा शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली आणि 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

चर्चेतून निघाला मार्ग:

आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना प्रथम आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी नागपूरला पाठवले. त्यानंतर आंदोलकांना मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर चर्चेसाठी बोलावण्यात आले.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री आणि मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. आंदोलक प्रतिनिधींमध्ये बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, वामनराव चटप, महादेव जानकर, रविकांत तुपकर आणि राजन क्षीरसागर यांसारखे महत्त्वाचे शेतकरी नेते सहभागी झाले होते.

कर्जमाफीबाबत सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा केली. कर्जमाफी कशी करावी, याचे निकष काय असावेत आणि भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती शेती क्षेत्रातील सुधारणांवर अभ्यास करून एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात शिफारशीसह आपला अहवाल सादर करेल. या शिफारसींच्या आधारावर पुढील प्रक्रिया पूर्ण करून 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल.

आर्थिक बोजा आणि पॅकेज वितरण:

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारवर आर्थिक अडचणीचा बोजा असला तरी, शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढणे आवश्यक आहे. सध्या 32,000 कोटी रुपयांच्या पॅकेज वितरणाला प्राधान्य दिले जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना रब्बीची पेरणी करता येईल. आत्तापर्यंत 8,000 कोटी रुपये खात्यात जमा झाले असून, पंधरा दिवसांत 90 टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बच्चू कडू यांची प्रतिक्रिया:

बच्चू कडू यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “आम्ही कर्जमाफीबाबत तारीख घेण्यासाठी आलो होतो, ती आज मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे आणि ते शब्द पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

Web Title:
संबंधित बातम्या