Mumbai Cricket Election:- मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपाचे नेते आशिष शेलार विशेष रस घेत आहेत. परंतु या निवडणुकीत (Mumbai Cricket Election:) आशिष शेलार यांना महत्त्वाचे स्थान मिळू नये, त्यांचे वर्चस्व राहू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरून हालचाली केल्या जात आहेत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा नुकतेच भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मुंबईत आले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी महाराष्ट्रातील विरोधकांना संपवा, असे म्हटले होते. त्यावरून ठाकरे गटाने आपला संताप व्यक्त केला आहे. भाजपामध्येच अंतर्गत संघर्ष असून, असा दावा करून ठाकरे गटाने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्व काही आलबेल नाही हे आता उघड झाले आहे. भाजपा विरुद्ध भाजपा हे जागोजागीचे चित्र आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपाच्या आशिष शेलार यांना महत्त्वाचे स्थान मिळू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरून सूत्र हलवली जात आहेत.
भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की, आशिष शेलार हे मंत्री असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. कारण ही दोन लाभाची पदे आहेत, अशी माझी माहिती आहे. परंतु आशिष शेलार हेच एमसीएमध्ये आमचे प्रतिनिधित्व करतात. तेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून निर्णय घेतात. एमसीएच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी यंदा शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे शिवसेनेचे आमदार किरण सामंत आणि भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. अलीकडेच या उदय सामंत, प्रताप सरनाईक-विहंग सरनाईक आणि प्रसाद लाड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मागील निवडणुकीत आशिष शेलार यांच्या पाठिंब्याने उभा राहिलेला उमेदवार पराभूत झाला होता. तर पवार गटाशी संबंधित अजिंक्य नाईक विजयी झाले होते. यंदाही अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्यात आशिष शेलार यांचे महत्त्व कमी केले जात असल्याच्या बातमीने खळबळ उडवली आहे.









