Womens World Cup 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर तो दिवस आणलाच! कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2025 आयसीसी महिला विश्वचषकाचे (Womens World Cup 2025) जेतेपद जिंकून एक नवा अध्याय लिहिला आहे.
एक महिन्यापासून सुरू असलेल्या या थरारक स्पर्धेचा शेवट भारताने आपल्या पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीसह केला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला (Ind vs SA) पराभूत करून महिला संघाने देशातील कोट्यवधी चाहत्यांना आनंद दिला.
Womens World Cup 2025 : 51 कोटी रुपयांचे बक्षीस
या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने (BCCI) महिला संघावर अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसह संपूर्ण टीम इंडियासाठी तब्बल 51 कोटी रुपयांचे भव्य रोख बक्षीस जाहीर केले आहे.
सैकिया यांनी या विजयाचे श्रेय बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या धोरणांना दिले. त्यांनी सांगितले की, जय शाह यांनी 2019 ते 2024 या कार्यकाळात महिला क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवले. ‘पे पॅरिटी’ (समान मानधन) सारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. एवढेच नाही तर, आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महिलांच्या वर्ल्ड कप बक्षीस रकमेत 300% ची विक्रमी वाढ केली आहे.
त्यामुळे, पूर्वी $2.88 मिलियन असलेली ही रक्कम आता $14 मिलियन झाली आहे. या पावलांमुळे महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर एक मोठी ओळख मिळाली आहे.
याव्यतिरिक्त, आयसीसीनेही विश्वचषक विजेत्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कम ठेवली आहे. विजेत्या भारतीय संघाला $4.48 मिलियन (अमेरिकन डॉलर्स) म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 39.55 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
BCCI Secretary Devajit Saikia announces ₹51 Crore cash reward for the Indian Women's cricket team after it won the ICC Women's World Cup https://t.co/NkU9VOC3jB
— ANI (@ANI) November 2, 2025
अंतिम सामन्याचा थरार: दीप्ती शर्मा ठरली विजयाची शिल्पकार
दरम्यान, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी मात्र सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. स्मृती मानधना (45) आणि शफाली वर्मा (87) यांनी दिलेली मजबूत सलामी, त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स (24) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (20) यांच्या योगदानाने भारताचा डाव स्थिर राहिला.
शेवटच्या 15 षटकांत भारताच्या लोअर-ऑर्डरने धडाकेबाज कामगिरी केली. दीप्ती शर्माने (58) अर्धशतक झळकावले, तर रिचा घोषने (34) आक्रमक फलंदाजी करत भारताला 50 षटकांत 298/7 पर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून आयबोंगा खाका (3/58) हिने चांगली गोलंदाजी केली.
299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलवार्ड्ट हिने एकहाती झुंज दिली आणि शानदार 101 धावांचे शतक झळकावले. मात्र, दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट्स घेतल्या. शफाली वर्मा आणि श्री चरणी यांनी मधल्या फळीतील फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
शेवटी, भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने तिच्या जादुई गोलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले. तिने सेट झालेल्या वोलवार्ड्टसह महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि विक्रमी 5/39 अशी कामगिरी केली. वर्ल्ड कप फायनलमध्ये 5 विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. दीप्तीच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 246 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने 52 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
हे देखील वाचा – Olympic Association Election : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार विराजमान..









