ISRO CMS-03 : भारताच्या सागरी सीमा आणि दळणवळण क्षमता अधिक मजबूत झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आपल्या सर्वात मोठ्या LVM-3 रॉकेटचा वापर करत भारतीय नौदलासाठी (Indian Navy) अत्यंत महत्त्वाचा असलेला CMS-03 (GSAT-7R) हा संपर्क उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे.
हा उपग्रह नौदलाला समुद्रात लांब पल्ल्याचे दळणवळण स्थापित करण्यासाठी मदत करेल.
या मोहिमेत, इस्रोने एक मोठा विक्रम नोंदवला आहे. प्रथमच भारतीय भूमीवरून 4,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा उपग्रह थेट दूरच्या जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) स्थापित करण्यात आला. 4,410 किलोग्रॅम वजनाचा हा मल्टीबँड उपग्रह GTO मध्ये सुमारे 29,970 कि.मी. x 170 कि.मी. च्या कक्षेत ठेवला गेला आहे.
ISRO CMS-03 : स्वदेशी क्षेपणास्त्र-क्षमतेचा महत्त्वाचा टप्पा
आतापर्यंत, इस्रोला या वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी एलॉन मस्कच्या स्पेस-एक्स किंवा एरियन स्पेस सारख्या परदेशी संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. या यशस्वी प्रक्षेपणामुळे LVM-3 रॉकेटची वाढलेली आणि सिद्ध झालेली क्षमता स्पष्ट झाली आहे. ही क्षमता केवळ व्यावसायिक प्रक्षेपणांसाठीच नव्हे, तर भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानवी अंतराळ मोहिमेसाठीही निर्णायक ठरणार आहे.
Our space sector continues to make us proud!
— Narendra Modi (@narendramodi) November 2, 2025
Congratulations ISRO on the successful launch of India’s heaviest communication satellite, CMS-03.
Powered by our space scientists, it is commendable how our space sector has become synonymous with excellence and innovation. Their…
LVM-3 (पूर्वीचे GSLV Mk 3) हे त्रय-इंधन रॉकेट असून ते लो अर्थ ऑर्बिटमध्ये 8,000 किलोग्रॅमपर्यंत आणि जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये 4,000 किलोग्रॅमपर्यंत पेलोड वाहून नेऊ शकते. 2022 मध्ये, LVM-3 ने 72 वनवेब उपग्रह यशस्वीरित्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती, ज्यामुळे त्याचे नाव ‘GSLV’ वरून ‘LVM-3’ असे बदलण्यात आले.
ISRO CMS-03 : भविष्यासाठी LVM-3 मध्ये सुधारणा
LVM-3 रॉकेटची क्षमता आणखी वाढवण्यासाठी इस्रो सध्या अनेक महत्त्वपूर्ण बदल करत आहे, विशेषतः गगनयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर.
- क्रायोजेनिक इंजिनची ताकद: रॉकेटची क्षमता वाढवण्याचा मुख्य भर क्रायोजेनिक अप्पर स्टेजवर आहे. सध्याची C25 स्टेज 20 टन थ्रस्ट निर्माण करते, तर नवीन C32 स्टेज मध्ये 32,000 किलोग्रॅम इंधन क्षमता असेल आणि ती 22 टन थ्रस्ट निर्माण करेल.
- सेमी-क्रायोजेनिक इंजिन: इस्रो दुसरे इंजिन लिक्विड-प्रोपेलेंटऐवजी ‘रिफाईंड केरोसीन’ आणि लिक्विड ऑक्सिजनवर चालणाऱ्या सेमी-क्रायोजेनिक इंजिनने बदलण्याचा विचार करत आहे. यामुळे इंजिन अधिक शक्तिशाली होईल, पेलोड क्षमता 10,000 किलोग्रॅमपर्यंत वाढेल आणि प्रक्षेपणाचा खर्चही कमी होईल.
या बदलांमुळे LVM-3 हे भविष्यात भारतीय अंतराळ स्थानकाचे (पहिले मॉड्युल प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज होईल. याव्यतिरिक्त, इस्रो LMLV (Lunar Module Launch Vehicle) विकसित करत आहे, जे मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या ‘मून मिशन’साठी 80,000 किलोग्रॅमपर्यंत पेलोड वाहून नेण्यास सक्षम असेल.
LVM-3 हे इस्रोचे आजवरचे सर्वात यशस्वी प्रक्षेपक आहे. त्याने आजपर्यंतची सर्व 7 उड्डाणे यशस्वी केली आहेत. चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 सारख्या देशाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांमध्ये LVM-3 नेच प्रमुख भूमिका बजावली आहे.
हे देखील वाचा – फक्त ट्रॉफी नाही, इतिहास रचला! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला BCCI चे सर्वात मोठे बक्षीस जाहीर









