Prakash Surve Statement : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी धक्कादायक विधान केले.
आमदार सुर्वे यांचे नेमके विधान
सुर्वे म्हणाले, “मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे. कारण आईपेक्षा जास्त प्रेम मावशी करते. आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही (उत्तर भारतीय समाजाने) मला दिले आहे.” हे विधान त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवरही प्रेम ठेवण्याच्या उद्देशाने केले असल्याचे सांगितले.
सुर्वे यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. मात्र, त्यांच्या या विधानामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.
विरोधकांकडून तीव्र टीका
सुर्वे यांच्या या विधानावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांनी तीव्र टीका केली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुर्वे यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. त्यांनी टीका केली की, “आई मेली तरी चालेल असं बोलणारा मुलगा न झालेला बरा. 2022 मध्येच या लोकांनी आईला (मूळ शिवसेनेला) रामराम केला आहे. मतांसाठी ही जमात कुठल्याही स्तरावर जाऊ शकते, हे दिसत आहे.”
https://t.co/Ql4UJ1K9Om
— Nayan Kadam (@Nayan7217_) November 3, 2025
फेसबुक शेवट बघा. मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का ?
"मराठी मेली तरी चालेल" स्वतःच्या आईला मारून यूपी ची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध.@mnsadhikrut @RajThackeray @News18lokmat @TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @LokshahiMarathi pic.twitter.com/PJz8UZd1XK
मनसे नेते नयन कदम यांनी सुर्वे यांचा व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आणि या आमदाराचा जाहीर निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनीही सुर्वे यांच्या विधानाला ‘अर्थहीन’ ठरवले.
आमदार सुर्वे यांचे स्पष्टीकरण
सोशल मीडियावर हे विधान व्हायरल झाल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले आहे. सुर्वे यांचा दावा आहे की, “माझ्या बोलण्याचा हेतू वेगळा होता. विरोधक त्याचा विपर्यास करत आहेत. आई नसते तेव्हा मावशी आपल्यावर प्रेम करते, हा माझ्या बोलण्याचा हेतू होता.” त्यांनी पुढे म्हटले,
“कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुर्वे यांच्या या विधानामुळे शिंदे गटाची राजकीय अडचण वाढली आहे.









