Ind vs SA : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला वगळल्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शमीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला करण्यात आले आहे का, असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.
दुसरीकडे, संघासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंड दौऱ्यावर क्रिस वोक्सच्या चेंडूने पायाला दुखापत झाल्यामुळे पंत क्रिकेटपासून दूर होता. त्याने बंगळूरु येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे रिहॅब पूर्ण केले.
पंतची उपकर्णधारपदी निवड
दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या मालिकेत कर्णधार म्हणून प्रभावी कामगिरी केल्यानंतर 28 वर्षीय पंतला थेट कसोटी संघात स्थान मिळाले आहे. तो पुन्हा एकदा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली उपकर्णधारम्हणून जबाबदारी सांभाळेल. संघात ध्रुव जुरेल (याला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.
संघात झालेले बदल
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अक्षर पटेल याला संघात परत संधी मिळाली आहे. अक्षर पटेलने 2024 नंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही, तरी त्याला रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासाठी बॅकअप म्हणून पाहिले जात आहे. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत बाहेर असलेला आकाश दीप याचेही संघात पुनरागमन झाले आहे.
ही मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ तेंबा बावुमाच्या पुनरागमनाने पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.
Ind vs SA : मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोलकातामधील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल, तर दुसरा सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटीमध्ये होईल. कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 5 टी20 सामने खेळले जातील.
हे देखील वाचा – Starlink Maharashtra : डिजिटल महाराष्ट्राला मिळणार गती! मस्क यांच्या ‘स्टारलिंक’सोबत करार करणारे ठरले देशातील पहिले राज्य









