Sulakshana Pandit : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि आपल्या सुमधुर गायकीने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या पार्श्वगायिका सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
रिपोर्टनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
निधनाची माहिती
सुलक्षणा पंडित यांचे बंधू ललित पंडित यांनी पीटीआयला (PTI) दिलेल्या माहितीत सांगितले की, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. “त्यांना अस्वस्थ वाटत होते आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुमारे 7 वाजता त्यांचे निधन झाले. आम्ही त्यांना नानावटी रुग्णालयात घेऊन जात असताना, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली,” असे ललित पंडित यांनी सांगितले.
सुलक्षणा पंडित यांची कला आणि कारकीर्द
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजीव कुमार यांच्यासोबतच्या ‘उलझन’ (Uljhan) या चित्रपटातून सुलक्षणा पंडित यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये ‘चेहरे पे चेहरा’, ‘संकोच’, ‘हेरा फेरी’, ‘खानदान’, ‘धरम काँटा’, ‘दो वक्त की रोटी’ आणि ‘गोरा’ यांचा समावेश आहे.
त्यांनी राजेश खन्ना, शशी कपूर (Shashi Kapoor) आणि विनोद खन्ना (Vinod Khanna) यांसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. तसेच, 1978 मध्ये उत्तम कुमार यांच्यासोबत ‘बंदी’ नावाच्या बंगाली चित्रपटातही त्यांनी अभिनय केला.
पार्श्वगायनात अप्रतिम कामगिरी
अभिनयाच्या प्रवासासोबतच, सुलक्षणा यांनी पार्श्वगायिका म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांनी हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजराती अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली. ‘तू ही सागर तू ही किनारा’, ‘परदेसिया तेरे देश में’, ‘बांधी रे कहे प्रीत’, ‘सात समंदर पार’, आणि ‘ये प्यार किया है’ ही त्यांची लोकप्रिय गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
संगीत क्षेत्रातील वारसा
सुलक्षणा पंडित यांचा जन्म हरियाणामधील (Haryana) हिस्सार येथील संगीतप्रेमी कुटुंबात झाला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज (Pandit Jasraj) हे त्यांचे काका होते. त्यांनी वयाच्या नव्या वर्षांपासूनच गाण्यास सुरुवात केली आणि त्यांचे बंधू मंधीर यांच्यासोबत संगीत क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले. त्यांचे बंधू जतीन पंडित, ललित पंडित आणि जुन्या काळातील अभिनेत्री विजयता पंडित हे त्यांचे कुटुंबीय आहेत.
हे देखील वाचा – Google Pixel 10 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट! मिळतात खूपच शानदार फीचर्स; पाहा डिटेल्स









