Vande Mataram 150 Years : भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ने (Vande Mataram) नुकताच 150 वर्षांचा आपला ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला आहे. बँकिंमचंद्र चॅटर्जी (Bankim Chandra Chatterjee) यांनी रचलेले हे स्तोत्र प्रथम 7 नोव्हेंबर 1875 रोजी ‘बंगदर्शन’ (Bangadarshan) या साहित्य मासिकात प्रकाशित झाले होते.
‘आई, मी तुला वंदन करतो’ असा अर्थ असलेल्या या गीताचा समावेश चॅटर्जी यांनी 1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘आनंदमठ’ (Anandamath) या अमर कादंबरीत केला.
या गीताला संगीत देण्याचे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांनी केले. त्यांनी 1896 मध्ये कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात हे गीत गायले.
राजकीय घोषणा ते राष्ट्रीय गीत
‘वंदे मातरम्’चा राजकीय घोषणेच्या स्वरूपात पहिला वापर 7 ऑगस्ट 1905 रोजी झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या गीताने क्रांतीची ज्योत पेटवली, परिणामी 1950 मध्ये याला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून सन्मानित करण्यात आले.
- उत्पत्ती: बँकिंमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचे क्रमशः प्रकाशन त्यांच्या ‘बंगदर्शन’ मासिकात सुरू असताना, हे गीत कादंबरीच्या पहिल्याच भागात (मार्च-एप्रिल 1881) समाविष्ट करण्यात आले होते.
- प्रचार: ऑगस्ट 1906 मध्ये बिपिन चंद्र पाल यांच्या संपादनाखाली आणि नंतर श्री अरबिंदो (Sri Aurobindo) यांच्या सहकार्याने ‘बंदे मातरम्’ नावाचे इंग्रजी दैनिक सुरू झाले. या दैनिकाने स्वदेशी, एकता आणि राजकीय जाणीवेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
- दडपशाही: या गीताचा वाढता प्रभाव पाहून ब्रिटिश प्रशासनाने कठोर पाऊले उचलली. नोव्हेंबर 1905 मध्ये, बंगालमधील रंगपूर येथील एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’ म्हटल्याबद्दल प्रत्येकी 5 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
- क्रांतिकारी स्फूर्ती: 1907 मध्ये भिकाजी कामा यांनी बर्लिनमधील स्टुटगार्ट येथे भारताचा तिरंगा पहिल्यांदा परदेशात फडकवला, तेव्हा त्यावर ‘वंदे मातरम्’ हे शब्द लिहिलेले होते. तसेच, नोव्हेंबर 1906 मध्ये महाराष्ट्रातील धुळे येथेही या घोषणांनी सभा गाजवली होती.
समान सन्मानाची स्वीकृती
संविधान सभेत (Constituent Assembly) ‘जन गण मन’ (Jana Gana Mana) आणि ‘वंदे मातरम्’ या दोन्ही गीतांना राष्ट्रीय प्रतीके म्हणून स्वीकारण्यावर एकमत झाले. 24 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad) यांनी संविधान सभेला संबोधित करताना स्पष्ट केले की, स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच समान दर्जा आणि सन्मान दिला जाईल. संविधान सभेने या विधानाला स्वीकारले आणि ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळाली.
हे देखील वाचा – Google Pixel 10 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट! मिळतात खूपच शानदार फीचर्स; पाहा डिटेल्स









