Parth Pawar- पुण्यातील अमेडिया कंपनीकडून कोरेगाव पार्क येथील 1,800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी करण्याच्या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (सुनेत्रा पवार यांचे भाचे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय हे केवळ 1 टक्के भागीदार असताना त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. मात्र, 99 टक्के भागीदार असलेल्या पार्थ पवारवर (Parth Pawar)गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दुसरीकडे पार्थच्या कंपनीला जमीन विकणारी शीतल सध्या फरार आहे. तिचा शोध चालू आहे. ती आणि तिच्या पतीवर सुमारे 100 कोटींचे कर्ज असल्याची माहिती आहे. तिचा पतीही बँक घोटाळ्यातील आरोपी आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला ही जमीन विकणारी शीतल तेजवानी या संपूर्ण व्यवहारातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असल्याचे बाहेर येत आहे. मूळ महार वतन असलेली ही 40 एकरची जमीन बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती. या जमिनीला सरकारच्या ताब्यातून सोडवून तिच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी शीतल हिने 272 मूळ मालकांचा शोध घेत नाममात्र 10 ते 15 हजार रुपये देऊन करून घेतली होती. त्यानंतर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीची निवड करून अत्यंत कमी किमतीत तिची विक्री केली. पार्थ पवार असल्याने या व्यवहारात काही अडचण येणार नाही, असे तिने ओळखले. त्यामुळे हा व्यवहार करण्यासाठी शीतल हिने अतिशय थंड डोक्याने सगळी योजना आखली, अशी माहिती उघडकीस येत आहे.
शीतलचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागरची ईडी चौकशीही झाली होती. मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही. सागर आणि शीतल यांच्यावर 100 कोटींंची विविध कर्जे आहेत. सागर सूर्यवंशीने रेणुका लॉन्सच्या नावे 2 वेगवेगळी वाहन कर्ज घेतली आहेत. त्यातील एक कर्ज 1 कोटी 16 लाख रुपयांचे, तर दुसरे कर्ज हे 2 कोटी 24 लाख रुपयांचे आहे. रेणुका लॉन्सच्या नावे वेगळे 5 कोटी 25 लाखांचे कर्जही आहे. शीतलनेही 2 वाहनांसाठी 4 कोटी 80 लाख कर्ज घेतले. सागर लॉन्सच्या नावावर 16 कोटी 48 लाख कॅश क्रेडिट कर्ज आहे. शीतलवर आणखी एक 10 कोटींचे कर्ज आहे. शीतलच्या पॅरामाऊंट इन्फ्रा कंपनीवर 5 कोटी 95 लाखांचे कर्ज आहे. आता शीतल आणि सागर यांचे आणखीही अनेक कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे.
याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, जमीन खरेदी प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले आरोपी क्रमांक एक आहेत. इतर आठ आरोपी आहेत. या प्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला असून, संबंधित प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.पार्थ पवार यांच्यावर गुन्हा न नोंदवण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या या प्रश्नावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही. तक्रार प्राप्त झाली, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे. तपास जसा पुढे जाईल, त्यानुसार त्यावर बोलणे योग्य होईल.
या विक्री व्यवहारावरून काँँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही टीका केली. त्यांनी एक्सवर लिहिले की, महाराष्ट्रामध्ये 1,800 कोटींची दलितांसाठी आरक्षित सरकारी जमीन आरक्षित 300 कोटींमध्ये मंत्र्याच्या मुलाला विकली. याशिवाय त्याची स्टॅम्प ड्युटीही रद्द केली. म्हणजे लूट तर लूट, त्यावर कायदेशीर सूट. ही जमीन चोरी त्या सरकारची आहे, जे मतचोरी करून सत्तेत आहे. त्यांना माहीत आहे की, पाहिजे तेवढी लूट करू शकतो आणि मतचोरी करून पुन्हा सत्तेत येऊ शकतो. यांना ना लोकशाहीची, ना जनतेची, ना दलितांच्या हक्काची चाड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गप्प बसणे, खूप काही सांगणारे आहे.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवसभरात दोन वेळा त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. संध्याकाळी राष्ट्रवादीची आढावा बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, मला या व्यवहाराबाबत माहिती नाही. मला माहिती असते तरी मी सर्वांना उघडपणे सांगितले असते. आता या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आला असून, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती एका महिन्याच्या आत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. व्यवहारासाठी मी कोणत्याही अधिकार्यांवर दबाव आणला नाही. या प्रकरणात एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही. मग नोंदणी कार्यालयात नोंद कशी झाली. कुणी दबाव आणला, कुणी फोन केले हे सर्व चौकशीतून उघड होईल. पार्थवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, नोंदणी कार्यालयात जाऊन सह्या केल्या, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पोलीस मुख्यालयात भेट घेतली. जैन बोर्डिंग प्रकरणात आरोप झालेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही यावेळी उपस्थित होते. या भेटीत शहरात दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात पाटील
यांनी चर्चा केली.
पार्थ पवारांचा बंगलाही वादात
पुण्यातील जिजाई बंगला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता याच बंगल्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवासी बंगल्यात व्यावसायिक कंपनी कशी चालवली जाते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा बंगला बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा आहे. अजित पवार येथे भाडेतत्त्वावर राहतात. याच ‘जिजाई’ बंगल्याचा पत्ता काही वर्षांपूर्वीच्या आदर्श घोटाळा प्रकरणातही वापरण्यात आला होता.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
सँडहर्स्ट रोड रेल्वे अपघात; कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार ! मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती









