Home / महाराष्ट्र / Parth Pawar Land Deal : ‘रजिस्ट्री रद्द झाली तरी…’; महार वतन जमीन प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Parth Pawar Land Deal : ‘रजिस्ट्री रद्द झाली तरी…’; महार वतन जमीन प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Parth Pawar Land Deal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40...

By: Team Navakal
Parth Pawar Land Deal
Social + WhatsApp CTA

Parth Pawar Land Deal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकरचा भूखंड खरेदी केल्याच्या कथित प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ही जमीन ‘महार वतन’ प्रकारातील असल्याचा आणि या व्यवहाराचे कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिमिनल केस कायम राहणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, संबंधित जमीन खरेदी-विक्रीची नोंदणी रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षांनी अर्ज केला आहे. “माझ्या माहितीनुसार, हा जो करार झाला होता, त्यात पैशांची देवाणघेवाण बाकी होती, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती. आता दोन्ही पक्षांनी रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर कार्यवाही करताना नियमानुसार त्यांना आवश्यक शुल्क भरावे लागेल, यासाठी नोटीस जारी झाली आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “हे जरी झाले तरी, या प्रकरणी दाखल झालेली क्रिमिनल केस संपणार नाही. या व्यवहारात ज्या अनियमितता आढळल्या आहेत, त्याला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल.”

अभय दिल्याचा आरोप निराधार

पार्थ पवार यांना अभय देऊन केवळ कंपनीच्या अधिकृत स्वाक्षरी करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळून लावला.

ते म्हणाले, “ज्यांना एफआयआर (FIR) काय असतो हे समजत नाही, तेच लोक असा आरोप करू शकतात. एफआयआर दाखल करताना करारात सहभागी असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात कंपनीचे ‘ऑथराइज्ड सिग्नेटरी’ ज्यांनी विक्री केली, ज्यांनी चुकीचे रजिस्ट्रेशन केले, ज्यांनी फेरफार केला, अशा सर्वांवर एफआयआर दाखल झाला आहे.”

“नियमानुसार, सही करणारे आणि पॉवर ऑफ अटर्नी धारक हेच एफआयआरचे जबाबदार असतात, त्यांना जबाबदार धरले आहे. चौकशीदरम्यान अजून कोणाची नावे समोर आली, तरी त्यांच्यावरही कारवाई होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

एक महिन्यात समांतर चौकशी अहवाल

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की, “या समितीच्या अंतर्गत समांतर चौकशी सुरू आहे. समिती एक महिन्यात आपला अहवाल देईल. या अहवालात या प्रकरणाची व्याप्ती किती आहे, यात अजून कोण-कोण सहभागी आहे, या संदर्भात माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारावर पुढील कठोर कारवाई केली जाईल.”

या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे आणि घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत सांगितले की, अहवालात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई होईल या मताशी अजित पवार देखील सहमत असतील. ‘चुकीचे काम करणाऱ्याला सरकार पाठीशी घालणार नाही,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या