Home / महाराष्ट्र / Sharad pawar: सिंचन घोटाळ्यावेळी शांत राहिलेल्या शरद पवारांची नातू पार्थच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी

Sharad pawar: सिंचन घोटाळ्यावेळी शांत राहिलेल्या शरद पवारांची नातू पार्थच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी

Sharad pawar: राजकारण, सत्ताकारण आणि कुटुंब या स्वतंत्र बाबी असल्याची भूमिका शरद पवार (Sharad pawar)हे सोयीनुसार घेत असतात. राष्ट्रवादी...

By: Team Navakal
Sharad pawar
Social + WhatsApp CTA

 Sharad pawar: राजकारण, सत्ताकारण आणि कुटुंब या स्वतंत्र बाबी असल्याची भूमिका शरद पवार (Sharad pawar)हे सोयीनुसार घेत असतात. राष्ट्रवादी पक्ष एक असताना अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. त्यावेळी शरद पवार यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी ही मागणी केली नाही . आता मात्र अजित पवार गट वेगळा झाल्यावर उघड झालेल्या नातू आणि अजित पवार पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. हा प्रकार गंभीर आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अशी पुष्टी जोडत त्यांनी चौकशीचीही मागणी केली, हेही विशेष आहे.


शरद पवार आज अकोला दौर्‍यावर होते. किसान ब्रिगेडने आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांना पार्थ यांच्या जमीन खरेदी प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आले. त्यांना उत्तर देताना पवार म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी  या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे. ही समिती एका महिन्यात अहवाल सादर करेल. फडणवीस यांनीही हा विषय गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवले पाहिजे. हे काम त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे. पार्थवर गुन्हा का दाखल झाला नाही, याचे उत्तर गृहमंत्रीच देऊ शकतील. मला या प्रकरणातील शीतल तेजवानी व इतर कुणाचीही मला नावे माहिती नाहीत. ज्या लोकांनी हे आरोप केले आहेत, त्यांनीच हे सर्व शोधून काढावे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार प्रकरणात व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. कुटुंब व राजकारण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुटुंबात आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही, तर आमची विचारधारा आणतो. कुटुंब वेगळे व विचारधारा वेगळी असते.
दरम्यान, अमेडिया कंपनीचा  जमीन व्यवहार रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी तो अजून रद्द झालेला नाही. तो रद्द करण्यासाठी  कागदपत्रांवर ज्यांनी स्वाक्षरी केली. त्यांनाच यावे लागेल, तसेच व्यवहार नोंदणीचे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असे सहनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. आयटी पार्क उभारण्याच्या कारणावरून पूर्वी देण्यात आलेली मुद्रांक शुल्क सवलत आता लागू राहणार नाही. या व्यवहारावर 5 टक्के मुद्रांक शुल्क, 1 टक्का स्थानिक संस्था कर आणि 1 टक्का मेट्रो कर अशा एकूण 7 टक्के दराने शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, या प्रकरणातील शीतल तेजवानी सध्या फरार आहे. तिचा मोबाईल बंद आहे. तसेच पोलिसांना ती घरीही आढळली नाही. शीतल पतीसह विदेशात गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे बावधन पोलीस इमिग्रेशन विभागाकडे माहिती मागवून तिच्या परदेश प्रवासाची खात्री करणार आहेत.


या गैरव्यवहार प्रकरणानंतर बोपोडीत बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील हेमंत गावंडे यांनी यापूर्वी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे  यांच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या  घोटाळ्याची माहिती दिली.
याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, पुणे येथील बोपोडी जमीन बनावट कागदपत्रे तयार करून गावडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्वतःच्या नावावर करण्यात आली. ही जमीन जमीन मूळची पेशव्यांची मालकी होती आणि विध्वंस-भट कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अटीवर दिली होती. 1883 मध्ये ती जमीन शासकीय मालकीची झाली. 1920 मध्ये ती कृषी महाविद्यालयाला देण्यात आली. विध्वंस कुटुंबाला हाताशी धरून तेजवानी यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर 2009 पासून ही फसवणूक सुरू झाली. मी कृषिमंत्री असताना ही फाइल माझ्याकडे होती. जमीन सरकारी असल्याने ती कोणालाही देऊ नये, असे आदेश मी दिले होते. तरीही संबंधितांनी ती आपल्या नावावर करून टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांनी या प्रकरणात हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, शीतल तेजवानी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात योगायोगाने हेच संशयित म्हणून समोर आले आहेत.


काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री व बाळासाहेब थोरात यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, संबंधित जागेची फाइल माझ्याकडे ही दोन-तीन वेळा आली होती, मात्र आपण त्यावेळी नकार दिला होता. ही फाईल उच्च न्यायालयात जाऊन आल्यानंतरही मी ती नाकारली होती. सरकारी जमिनी लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत असतात, त्यामुळे महसूलमंत्री म्हणून आपण त्या जमिनीचे रखवालदार असतो. असे निर्णय काळजीपूर्वकच घ्यावे लागतात. या प्रकरणात पार्थचे चुलतभाऊ आमदार रोहित पवारांनी मात्र अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर उपरोधिक निशाणा साधला. संजय शिरसाट म्हणाले की, अरे रे, माझ्या लाडक्या पोपटाची म्हणजे रोहित पवार यांची वाचा गेली. ते काही विषयांवर विद्वान असल्यासारखे बोलतात. मागे माझी दाढ दुखत असताना त्यांनी पोस्ट केली होती की, माझी दातखिळी बसली. आता वाटते, त्यांचीच वाचा गेली आहे.


हे देखील वाचा –

वंदे मातरमला १५० वर्ष पूर्ण! मोदींनी गायला वगळलेला भाग

 चाकणकरांवर टीका भोवली; रुपाली ठोंबरेंना पक्षाची नोटीस

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या