Narco Test : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येची अडीच कोटी रुपयांची सुपारी (Contract Killing) देण्यात आल्याच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला, तर मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, “माझी आणि जरांगे यांची नार्को टेस्ट (Narco Test) करा,” अशी थेट मागणी केली.
मुंडे यांच्या मागणीनंतर जरांगे यांनीही नार्को टेस्टसाठी तयारी दर्शवली आहे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकांकडे तसा अर्ज दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी गोंदी पोलिसांनी गेवराई येथील अमोल खुणे आणि विवेक गरूड या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करताना चर्चेत येणारी ‘नार्को टेस्ट’ नेमकी काय आहे, तिची प्रक्रिया काय आणि तिचे नियम काय आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
नार्को टेस्ट म्हणजे काय?
नार्को टेस्टला नार्को ॲनालिसिस असेही म्हणतात. ही तपासणीची एक विशेष पद्धत आहे, ज्यात संशयित व्यक्तीला सोडियम पेंटोथल (Sodium Pentothal) किंवा तत्सम औषध (ज्याला ट्रूथ सीरम – Truth Serum असेही म्हणतात) इंजेक्शनद्वारे दिले जाते. या औषधामुळे ती व्यक्ती अर्धवट बेशुद्धावस्थेत जाते.
- या अवस्थेत व्यक्तीच्या मेंदूवरील विचारपूर्वक उत्तर देण्याचे नियंत्रण थोडे शिथिल होते. त्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती ( कमी होते आणि लपवलेली माहिती बाहेर येण्याची शक्यता वाढते.
- या औषधाचा डोस व्यक्तीचे वजन आणि स्थितीनुसार डॉक्टर ठरवतात.
नार्को टेस्टची प्रक्रिया आणि नियम:
गुन्हेगारांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलीस अनेकदा नार्को टेस्टचा उपयोग करतात. मात्र, ही प्रक्रिया विशिष्ट नियमांचे आणि वैद्यकीय मानकांचे (Medical Standards) पालन करूनच केली जाते:
- पॉलीग्राफ चाचणी: नार्को टेस्टपूर्वी आरोपीची पॉलीग्राफ किंवा लाय डिटेक्टर चाचणी करणे बंधनकारक आहे.
- वैद्यकीय तपासणी: फुफ्फुसे आणि हृदयाची चाचणी करून आरोपी नार्को टेस्टसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे की नाही, हे पाहिले जाते.
- न्यायालयाचा आदेश व संमती: 2010 मध्ये Selvi vs State of Karnataka खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, नार्को टेस्ट केवळ न्यायालयाच्या आदेशानेच करता येते. तसेच, टेस्टसाठी संबंधित व्यक्तीची लिखित संमती असणे अनिवार्य आहे. जबरदस्ती करणे बेकायदेशीर आहे.
- नियंत्रित वातावरण: ही चाचणी हॉस्पिटल किंवा फॉरेन्सिक लॅबमध्येच, भूलतज्ज्ञ (Anaesthetist), मानसशास्त्रज्ञ (Psychologist), डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते.
नार्को टेस्ट किती विश्वासार्ह?
चित्रपटांमध्ये नार्को टेस्टनंतर आरोपी लगेच सत्य बोलतो असे दाखवले जात असले तरी, तज्ज्ञांच्या मते ही प्रक्रिया 100 टक्के विश्वासार्ह नाही.
या अर्धवट बेशुद्धावस्थेत व्यक्ती अनेकदा स्वप्ने आणि वास्तव यातील फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे व्यक्ती गोंधळू शकते आणि मनातल्या कल्पना व आठवणी एकत्र होऊन बाहेर पडू शकतात.
या चाचणीतून मिळालेली माहिती फक्त तपासाला दिशा देण्यासाठी उपयोगी ठरते. ही माहिती भारतीय कोर्टात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही.
भारतातील गाजलेली नार्को टेस्ट प्रकरणे:
भारतात अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये नार्को टेस्टचा वापर केला गेला आहे:
इंद्राणी मुखर्जी – शीना बोरा खून प्रकरण
अजमल कसाब – 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला
अब्दुल करीम तेलगी – स्टॅम्प पेपर घोटाळा
अबू सालेम – 1993 मुंबई बॉम्बस्फोट
मोनिंदर पंधेर, सुरेंद्र कोली – निठारी हत्याकांड
हे देखील वाचा – Digital Gold : 10 रुपयांत ‘डिजीटल गोल्ड’ खरेदी करताय? गुंतवणूकदारांना सेबीचा महत्त्वाचा इशारा









