Matoshree Drone- वांद्रे येथील मातोश्री परिसरात अज्ञात ड्रोन (Matoshree Drone)उडताना दिसल्याने आज खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाची हेरगिरी होत असल्याचा आरोप उबाठाकडून करण्यात आला. मात्र, मुंबई पोलिसांनी हा ड्रोन एमएमआरडीएने विशेष परवानगी घेऊन सर्वेक्षणासाठी उडवल्याचे स्पष्ट करत हा आरोप निराधार ठरवला.
मुंबईत सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक भाग नो-ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहेत. या परिसरात ड्रोन उडवण्यास कायद्याने बंदी असून, यात उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही समावेश आहे. तरीही मातोश्री परिसरात ड्रोन उडताना दिसल्याने वाद निर्माण झाला. या घटनेनंतर उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, मातोश्रीवर कोणी टेहळणी करत आहे का? तर सुषमा अंधारे यांनी हा ठाकरेंवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चौकशीची मागणी करत म्हटले की, तपास झाला नाही, तर हे ड्रोन सत्ताधार्यांचेच आहेत असे समजावे लागेल. विरोधकांवर नजर ठेवण्याचे यापूर्वी अनेक प्रकार घडले आहेत.
उबाठाने यावरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केल्यानंतर भाजपाने उबाठावरच आरोप केले. आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, हा ठाकरेंचाच स्टंट आहे. त्यावर उबाठाने त्यांना प्रत्युत्तर दिले की, ठाकरेंना स्टंट करण्याची गरज नाही, स्टंटबाजी भाजपाच करत आली आहे. मात्र, उबाठाकडून आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी असे स्पष्टीकरण दिले की, हा ड्रोन एमएमआरडीएने विशेष परवानगी घेऊन
सर्वेक्षणासाठी उडवला होता. यावर आमदार आदित्य ठाकरे एक्स पोस्ट करत म्हणाले की, आज सकाळी आमच्या निवासस्थानाजवळ एक ड्रोन फिरताना दिसला. माध्यमांना याची माहिती मिळाल्यानंतर आता एमएमआरडीए सांगत आहे की, हा ड्रोन बीकेसी परिसराच्या सर्व्हेसाठी उडवण्यात आला होता आणि त्यासाठी मुंबई पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती. ठीक आहे. पण कोणता असा सर्व्हे असतो, जो घराच्या आत डोकावतो आणि लगेच पळ काढतो? परिसरातील रहिवाशांना याची आधी माहिती का देण्यात आली नाही? एमएमआरडीए बीकेसीचा सर्व्हे करत आहे की फक्त आमच्या घरावरच नजर ठेवत आहे? एमएमआरडीएने अशा सर्व्हेऐवजी जमिनीवर उतरून आपल्या कामाच्या ढोंगावर लक्ष द्यावे. अटल सेतू हे त्यांच्या भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे आणि जर पोलिसांनी खरेच परवानगी दिली असेल, तर रहिवाशांना याची माहिती का देण्यात आली नाही? यानंतर एमएमआरडीएने स्पष्टीकरण दिले की, नियोजित पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी हा सर्व्हे केला. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या पोलिसांकडून घेण्यात आल्या होत्या.
हे देखील वाचा –
बोरिवली-गोराईतील प्रस्तावित कबुतरखान्याला मनसेचा विरोध
लालूंचा दुरावलेला पुत्र तेजप्रतापला केंद्र सरकारची वाय प्लस सुरक्षा









