Delhi Blast : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटाच्या घटनेने देशभरात खळबळ माजवली आहे. या भीषण घटनेत 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटात वापरण्यात आलेल्या Hyundai i20 कारचे मालकी हक्क तपासताना त्याचे धागेदोरे थेट जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील एका व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत.
कारचा मालक पुलवामाचा
NDTV च्या रिपोर्टनुसार, हरियाणातील गुरुग्राम पोलिसांनी HR26 CE 7674 या क्रमांकाच्या i20 कारचा मूळ मालक मोहम्मद सलमान याला अटक केली. मात्र, सलमानने पोलिसांना सांगितले की, त्याने ही कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकली होती. तारिक हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील रहिवासी आहे. यानंतर तारिकने ती कार पुढे कोणाला विकली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
स्फोटाचा घटना
काल (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 6.52 वाजता, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट 1 जवळील सिग्नलवर ही कार थांबताच एका मिनिटाच्या आत स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की तो कारच्या मागील भागातून झाला, असे सूत्रांनी सांगितले. स्फोटामुळे ई-रिक्षासह सुमारे 20 वाहनांना आग लागली आणि ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 40 मिनिटे लागली. घटनास्थळी मृतदेह आणि वाहनांचे अवशेष विखुरलेले होते.
तपास आणि जप्तीचे धागेदोरे
स्फोटाच्या काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीवरून हरियाणातील फरिदाबाद येथे मोठी कारवाई करण्यात आली होती. येथे दोन निवासी इमारतींमधून सुमारे 3,000 किलो स्फोटके जप्त करण्यात आली, ज्यात बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाणारे 350 किलो अमोनियम नायट्रेट होते. अटक केलेला जम्मू-काश्मीरमधील डॉक्टर आदिल राथर याच्या माहितीवरून ही कारवाई झाली होती.
याव्यतिरिक्त, गुजरातची राजधानी गांधीनगरजवळच्या अदलाज येथील डॉक्टर अहमद मोहियुद्दीन सय्यद यालाही शस्त्रे आणि दारूगोळ्यासह अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून आढावा
स्फोटाच्या घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण माहिती दिली. तसेच, गृहमंत्री शाह यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
तसेच, 2019 मध्ये 40 सैनिक शहीद झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातही Maruti Eeco व्हॅनचा वापर झाला होता आणि त्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. त्यामुळे या स्फोटातील पुलवामा कनेक्शन गंभीर मानले जात आहे.
हे देखील वाचा – Delhi Blast : दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…









