Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी दरमहा ₹1,500 ची मदत देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या ताणामुळे हा निर्णय घेतला जाईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे आणि ही योजना अखंडितपणे सुरू राहील अशी ग्वाही दिली आहे.
शिंदे यांनी स्पष्ट केले की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे सरकारचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. विशेष म्हणजे, या योजनेच्या लाभार्थी महिलांनी निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळवून देण्यात सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यामुळे, महिलांसाठीची ही योजना कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही.
E-KYC ची वेळ वाढवली
या योजनेसाठी E-KYC (ई-केवायसी) पूर्ण करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरला संपत आहे. या योजनेत काही अपात्र लोकांनी (जसे की सरकारी कर्मचारी आणि काही पुरुष) लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने पात्र महिला निश्चित करण्यासाठी E-KYC बंधनकारक केले होते.
यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात आलेल्या महापुराच्या संकटामुळे अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले नव्हते.
ही अडचण लक्षात घेऊन राज्याचे मंत्री आदित तटकरे यांनी E-KYC पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा केली होती. ज्या महिलांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना 17 नोव्हेंबरची अंतिम मुदत गाठण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन E-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांचे दरमहा ₹1,500 ची मदत थांबू शकते.









