Post Office Scheme : गुंतवणूक आणि बचतीच्या सरकारी योजनांमध्ये पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (MIS) ही ज्येष्ठ नागरिक तसेच नियमित मासिक उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, ही योजना धोकामुक्त आहे, कारण यात तुमच्या जमा रकमेच्या सुरक्षिततेची हमी थेट केंद्र सरकार देते. आता या योजनेत 7.40 टक्के दराने आकर्षक व्याज मिळत आहे.
तुम्ही आणि तुमचा जोडीदार (पती/पत्नी) दोघांनी मिळून या योजनेत जर एकरकमी गुंतवणूक केली, तर तुम्हाला दरमहा 9,250 रुपये निश्चित व्याज उत्पन्न मिळवता येते.
योजनेची खास वैशिष्ट्ये
- गुंतवणुकीचा प्रकार: ही एक एकरकमी गुंतवणूक योजना आहे.
- व्याजदर: वार्षिक 7.40 टक्के दराने व्याज मिळते.
- उत्पन्न: खाते उघडल्याच्या पुढील महिन्यापासूनच व्याजाचे पैसे मिळण्यास सुरुवात होते.
- परिपक्वता (मॅच्युरिटी): केवळ 5 वर्षांचा परिपक्वता कालावधी आहे.
गुंतवणुकीची मर्यादा आणि उत्पन्नाचे गणित
या योजनेत खाते 1,000 रुपयांपासून सुरू करता येते आणि त्यात खालीलप्रमाणे कमाल गुंतवणूक मर्यादा आहे:
- वैयक्तिक खाते (Single Account): यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतात.
- मासिक उत्पन्न: 9 लाख रुपयांवर दरमहा 5,500 रुपये व्याज मिळेल.
- संयुक्त खाते (Joint Account): यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात. (कमाल 3 प्रौढ व्यक्ती खाते उघडू शकतात).
- मासिक उत्पन्न: 15 लाख रुपयांवर दरमहा 9,250 रुपये व्याज मिळेल.
नियमित उत्पन्नाची हमी
ज्यांना दरमहा निश्चित आणि हमीसह उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. विशेषत: सेवानिवृत्त व्यक्ती आणि गृहिणींसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
खाते बंद करण्याचे नियम
5 वर्षांच्या मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केल्यास दंडाची तरतूद आहे:
- खाते उघडल्यापासून 1 ते 3 वर्षांच्या आत बंद केल्यास, मूळ रकमेपैकी 2% रक्कम कापली जाईल.
- 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास, 1% रक्कम कापली जाईल.
- जर मॅच्युरिटीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाला, तर खाते बंद करून नॉमिनीला (Nominee) जमा रक्कम आणि रिफंड मिळेपर्यंतचे व्याज दिले जाते.
खाते उघडण्याची प्रक्रिया
18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे, पॅन कार्डची प्रत आणि भरलेला अर्ज जमा करून लगेच खाते उघडू शकता.
हे देखील वाचा – Flipkart ची खास ऑफर! Oppo च्या फोनवर बंपर डिस्काउंट; मिळेल 7000mAh बॅटरी आणि 32MP कॅमेरा









