Home / News / Delhi Blast – Suicide Bomber Kills : दिल्ली स्फोट! मृतांची संख्या वाढली उमर सुसाईड बॉम्बर! 3 तास थांबला

Delhi Blast – Suicide Bomber Kills : दिल्ली स्फोट! मृतांची संख्या वाढली उमर सुसाईड बॉम्बर! 3 तास थांबला

Delhi Blast: Suicide Bomber Kills – राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी झालेल्या गाडीच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Delhi Blast: Suicide Bomber Kills – राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ काल संध्याकाळी झालेल्या गाडीच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आज 12 झाली. आज या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतले. दिल्लीसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपासून उच्चस्तरीय बैठका सुरू होत्या. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे सोपवला आहे.गृहमंत्रालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, दिल्ली पोलीस आयुक्त सतिश गोलचा आणि एनआयएचे महासंचालक सदानंद वसंत दाते उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात हे व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. या बैठकीत स्फोटामागील दहशतवादी कनेक्शनचा सखोल तपास करण्याचे निर्देश देण्यात आले.फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालानुसार, स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि डेटोनेटर वापरण्यात आले असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी इलेक्ट्रिक डिव्हाइसचे अवशेष सापडले नाहीत. त्यामुळे मॅन्युअल डेटोनेटरचा वापर झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. लाल किल्ला आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशन 13 नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. अमेरिकेसह फ्रान्स आणि ब्रिटनने आपल्या नागरिकांना लाल किल्ल्याजवळ जाण्याचे टाळावे, असा सल्ला दिला आहे. मुंबई, पुणे, चेन्नई आणि बंगळुरूमधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर आणि धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि सीएसएमटी स्थानक परिसरात विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. स्फोटात मृत झालेल्यांमध्ये मोहसीन (मेरठ), अशोक कुमार, लोकेश गुप्ता (अमरोहा), दिनेश मिश्रा (श्रावस्ती), पंकज सैनी (कांजवाला), नोमाना (दुकानदार), जुम्मन मोहम्मद (ई-रिक्षा चालक) आणि अमर कटारिया यांचा समावेश आहे. सात जणांच्या मृतदेहांची ओळख पटवून त्यांना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या स्फोटात वापरलेली ह्युंदाई आय 20 गाडी चालकाचा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंध असल्याची माहिती आहे. ही गाडी हरियाणाची आहे. ती अनेकांना विकली गेली. तिचे धागेदोरे थेट जम्मू-काश्मीरच्या पुलवामापर्यंत पोहोचले आहेत. गुरुग्राममधील मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर ही गाडी सुरुवातीला होती. त्याने ती ओखलामधील नदीमला विकली, त्यानंतर फरिदाबादमध्ये अमीर जो इलेक्ट्रिशन होता त्याने ही गाडी विकत घेतली आणि शेवटी पुलवामातील तारीक नावाच्या व्यक्तीने ती विकत घेतली. मात्र, तारिकने दावा केला आहे की, मी ही गाडी कधी पाहिलीच नाही. मात्र तारिकचे सिमकार्ड आमीर वापरायचा. तारीक आणि अमीर रशीद व त्याचा भाऊ उमर रशीद यांच्यावर संशय आहे. तारिक हा पुलवामाचा रहिवासी आहे. तो सध्या फरिदाबादमध्ये राहत होता. तो आणि अमिर हे दोघे फरीदाबादच्या अल फलिहा विद्यापीठात कामाला होते.सीसीटीव्ही तपासातून या गाडीच्या हालचालींचा संपूर्ण मागोवा उघड झाला आहे. ही गाडी काल सकाळी 8.04 वाजताच्या सुमारास बदरपूर परिसरातून दिल्लीमध्ये दाखल झाली. त्यानंतर ती दिल्लीतील विविध भागांतून फिरताना, सुमारे 8.20 वाजता ओखला येथील पेट्रोल पंपावर इंधन भरताना आढळली. पुढे दुपारी 3.19 वाजता गाडी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये पोहोचली आणि 6 वाजताच्या सुमारास गाडी पार्किंगमधून बाहेर पडली. या गाडीत उमर नाबी बसला होता. गाडी पार्किंगमध्ये असताना तो पूर्णवेळ गाडीत बसून होता. गाडीत उमर नाबी याच्या बरोबर आणखी एक व्यक्ती होता. गाडी बाहेर पडण्यापूर्वी तो उतरला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत संध्याकाळी 6.52 वाजता या गाडीत भीषण स्फोट झाला. यामुळे उमर नाबी हा आत्मघातकी दहशतवादी होता असा संशय आहे. गाडीतील मृताची डीएनए तपासणी सुरू आहे.फरीदाबादमध्ये अलीकडेच 2900 किलो स्फोटके सापडली होती. फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाशी निगडित दहशतवादी गटावर छापा टाकल्यानंतर उमर नबी फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या आई आणि भावाचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले आहेत. डॉ. उमर हा पुलवामा येथील कोइल येथील रहिवासी होता. त्याने 2017 मध्ये श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. तो उमर-अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर होता. या प्रकरणी तारिक अहमद, आमिर रशीद, शमीमा बानो, डॉ. उमरची पत्नी, त्याचे वडील, भाऊ जहूर नबी, त्याचा मित्र डॉक्टर सज्जाद यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय डॉ. उमरच्या आई आणि भावालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात फरीदाबादमधून डॉ. शाहीना नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ती जैश-ए-मोहम्मदच्या महिला विंग ‘जमात-उल-मोमीनात’ची भारतातील प्रमुख असल्याचे उघड झाले आहे. तिला भारतात महिला रिक्रूटमेंट नेटवर्क उभे करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तिच्या घरावर उत्तर प्रदेश एटीएसने छापा टाकून ते घर सील केले आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील स्फोटाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल दुःख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या भूतान दौर्‍यावर आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, दिल्ली लाल किल्ल्यावर घडलेला बॉम्बस्फोट भीषण होता. हे प्रकरण समोर येताच तपासाला सुरुवात झाली. आपली तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करेल. या षड्यंत्राचा सखोल तपास होईल. या बॉम्बस्फोट हल्ल्यामागे जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही. बॉम्बस्फोटातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मी पीडित लोकांच्या भावना समजू शकतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी काल रात्रभर या घटनेच्या तपास यंत्रणेच्या संपर्कात होतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या घटनेत देशातील आघाडीच्या तपास संस्था या घटनेची सखोल आणि जलद चौकशी करत आहेत. या घटनेच्या तपासाचे निष्कर्ष लवकरच सार्वजनिक केले जातील. दिल्ली स्फोटाच्या घटनेत दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या