MVA: No MNS Tie-Up in Municipality- नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणेच लढवण्याची घोषणा आज करण्यात आली. मुंबईत मविआ समन्वय समितीची बैठक झाली. स्थानिक पातळीवरील मविआ नेत्यांना गरजेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
पण पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मविआमध्ये मनसेला प्रवेश नाही, हा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. यामुळे ठाकरे बंधू आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, उबाठा खासदार अनिल देसाई व आमदार अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
यावेळी महायुतीतून बाहेर पडलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. मविआमध्ये रासपचा नव्याने प्रवेश झाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी बैठकीनंतर सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत आघाडीच्या संदर्भात मनसेला सोबत घेण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही.
प्रस्ताव आल्यास आम्ही एकत्रितपणे बसून निर्णय घेऊ. एकीकडे समन्वय साधत असताना, दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीमध्ये काँग्रेसचे एबी फॉर्म मोठ्या प्रमाणात नाकारले गेले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या लहरीपणापासून निवडणूक प्रक्रिया कशी वाचवता येईल, यावरही एकत्रित येऊन चर्चा करण्यात आली.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरायची मुदत आहे. त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत विभागीय पातळीवर तोडगा न निघालेल्या मुद्यांवर चर्चा होईल. स्थानिक पातळीवरून आलेल्या मुद्यांवर तोडगा काढला जाईल. प्रचाराची रणनीतीही निश्चित केली जाईल.
उबाठाचे अनिल परब यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर निर्माण होणारे तिढे सोडवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत समन्वय राखण्यासाठी राज्य स्तरावर प्रत्येक मित्रपक्षाचा एक प्रमुख नेता समन्वयक म्हणून नेमला जाईल. उमेदवारीबाबतचे मतभेद किंवा अडचणी सोडवण्यासाठी ही समन्वय समिती तत्काळ चर्चा करील. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी 19 नोव्हेंबरच्या बैठकीत सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. आजची बैठक पहिल्या टप्प्यातील निवडणुकीपुरतीच मर्यादित होती. टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर गोष्टी मांडल्या जातील.
हे देखील वाचा –
Health Tips : हिवाळ्यात थंड पाणी पिणे हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती बिघडली, अचानक चक्कर आल्याने तातडीनं रुग्णालयात दाखल









