Pune Land Scam – पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात काही दिवसांपासून बेपत्ता असलेली आरोपी शीतल तेजवानी अखेर समोर आली आहे. तेजवानीने स्वतःविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली.
मात्र, हायकोर्टाने तिला कोणताही दिलासा देण्यास नकार देत याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे तिच्या अडचणी आणखी वाढल्या असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपावरून शीतल तेजवानी, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि इतर संबंधितांविरोधात खडकी आणि बावधन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजवानी काही काळ गायब होती.
तेजवानीने अॅड. दीपाली केदार यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, एफआयआरमध्ये उल्लेख असलेल्या सर्वे क्र. ६२, मौजे बोपोडी या जमिनीशी तिचा कोणताही संबंध नाही. कोणत्याही तथ्यात्मक किंवा कायदेशीर आधाराशिवाय तिचे नाव गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.
मुंढवा येथील व्यवहारांवर नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल अद्याप सादर झालेला नसतानाही पोलिसांनी मनमानीपणे गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर अपरिपक्व आणि असमर्थनीय असल्याने हा गुन्हा रद्द करा. मात्र, मुख्य न्या. चंद्रशेखर आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठाने तिची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळली.
हे देखील वाचा –
पालिकेचा मालमत्ता कर थकविण्यात सरकारी कार्यालये आघाडीवर
मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई
केंद्र सरकारचे पुणेकरांना मोठे गिफ्ट! 1000 नव्या इलेक्ट्रिक बसेस खरेदीला मंजुरी









