Tuljapur Drug Case Accused Join BJP – तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे या दोघांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला.
यावरून शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळत आहे असा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचीही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी संतोष कदमने तुळजापूरचे नगराध्यक्षपद भूषवले होते. आता नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ते आरोपी असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित म्हटले की, शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीने भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे हा प्रवेश पक्षाच्या कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाला. याचे सखेद आश्चर्य वाटले.
कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी सार्वजनिक जीवनातील प्रत्येकावर असते. आपण राज्याचे प्रमुख आहात; कदाचित ही बाब आपल्या निदर्शनास आली नसावी. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. तुळजापूरमधील या प्रकाराची आपण गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी.
हे देखील वाचा –
पुणे जमीन घोटाळा! गुन्हा रद्द करा! तेजवानीची हायकोर्टात धाव
पालिकेचा मालमत्ता कर थकविण्यात सरकारी कार्यालये आघाडीवर
मुंब्रा येथील प्रोफेसर एटीएसच्या ताब्यात ! दिल्ली स्फोटानंतर कारवाई









