Delhi Car Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटावर अमेरिकेने ठोस भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या घटनेचे वर्णन ‘दहशतवादी हल्ला’ (Terrorist Attack) असे केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, रुबिओ यांनी या हल्ल्याच्या तपासात अमेरिकेने भारताला मदतीची देऊ केली असली तरी, भारत हा तपास हाताळण्यास ‘अत्यंत सक्षम’ असल्याचे सांगून त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला.
भारताने या स्फोटाला ‘दहशतवादी घटना’ घोषित केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मार्को रुबिओ यांनी हे स्पष्ट मत मांडले.
भारताच्या तपासाची पद्धत आहे व्यावसायिक
रुबिओ यांनी भारतीय तपास यंत्रणांचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय तपासणीची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. ते अत्यंत नियोजित, सतर्क आणि व्यावसायिक पद्धतीने या हल्ल्याची चौकशी करत आहेत. हा हल्ला स्पष्टपणे दहशतवादी होता. स्फोट झालेल्या या कारमध्ये अत्यधिक स्फोटक सामग्री भरलेली होती आणि त्यात अनेक निरपराध लोक मारले गेले.”
ते पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे की ते (भारतीय तपास यंत्रणा) त्यांचे काम उत्कृष्टपणे करत आहेत. जेव्हा त्यांच्याकडे निश्चित माहिती (Facts) येईल, तेव्हा ते ती जाहीर करतील.”
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या स्फोटाबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधल्याची माहिती दिली. रुबिओ म्हणाले, “हा हल्ला किती मोठा असू शकतो याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही आज याबद्दल थोडक्यात बोललो आहोत. या घटनेचे काही व्यापक परिणामहोण्याची शक्यता आहे. आम्ही तपासणीतून काय समोर येते याची वाट पाहत आहोत.”
त्यांनी पुन्हा जोर दिला की, अमेरिकेने मदतीची ऑफर दिली आहे, परंतु भारत तपास करण्यास खूप सक्षम आहे आणि त्याला आमच्या मदतीची गरज नाही. भारतीय यंत्रणा त्यांचे काम व्यवस्थित करत आहेत.
दरम्यान, कार स्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी घटना (Terrorist Incident) म्हणून घोषित करत तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने दिले आहेत.
हे देखील वाचा – Delhi Car Blast : दिल्ली कार स्फोट ‘दहशतवादी घटना’ घोषित; मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय









