Home / News / Shiv Sena, NCP Symbol Verdict Delayed to January 2026 : राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष व चिन्हाचा निर्णय निवडणुकीपूर्वी नाहीच! जानेवारीची तारीख दिली

Shiv Sena, NCP Symbol Verdict Delayed to January 2026 : राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष व चिन्हाचा निर्णय निवडणुकीपूर्वी नाहीच! जानेवारीची तारीख दिली

Shiv Sena, NCP Symbol Verdict Delayed to January 2026 – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष कुणाचा याचा...

By: Team Navakal
Shiv Sena, NCP Symbol Verdict Delayed to January 2026
Social + WhatsApp CTA

Shiv Sena, NCP Symbol Verdict Delayed to January 2026 – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष कुणाचा याचा निर्णय नगरपरिषद, पालिका निवडणुकांपूर्वी लागणार नाही हे आज स्पष्ट झाले. यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाला मोठा फायदा होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयात याविषयीच्या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र आजही युक्तिवाद न होता पुढची तारीख देण्यात आली. आता यावर 21 आणि 22 जानेवारी 2026 या दिवशी सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.

त्यामुळे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका निवडणूक ही मशाल चिन्हावर लढवावी लागणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हेच चिन्ह वापरावे लागेल. नगरपरिषद व पालिका निवडणुकीआधी अंतिम सुनावणी होऊन तातडीने निकाल यावा यासाठी ठाकरे गटाची धडपड सुरू होती ती अयशस्वी ठरली.


शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. असेच आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही दिले आहे. त्यावरच आज न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या पीठासमोर सुनावणी होती.

न्या. सूर्य कांत यांचा आज अखेरचा दिवस होता. आता ते सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे त्यांना सुनावणी घेण्यास दुपारी 2 वाजेपर्यंतच मुदत होती. त्यापूर्वी युक्तिवाद होऊन निकाल लागणे अशक्य होते. परिणामी आज पुढची सुनावणीची तारीखच मिळेल अशी चर्चा होती. न्यायालयाने सुरुवातीलाच युक्तिवादासाठी किती वेळ लागेल अशी विचारणा केली. त्यावर दोन्ही बाजूंनी दोन तास मागितले.


दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणीही करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांमधील कायदेशीर प्रश्न समान आणि संलग्न असल्याने यावर एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

गरज वाटली, तर दुसर्‍या दिवशीही सुनावणी सुरू ठेवता यावी म्हणून न्या. सूर्य कांत यांनी 22 जानेवारी रोजी कोणतीही महत्त्वाची प्रकरणे सूचीबद्ध न करण्याचे निर्देश न्यायालयीन कर्मचार्‍यांना दिले.


यावेळी उबाठा गटाकडून ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली, तर शिंदे पक्षाकडून ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एन. के. कौल उपस्थित होते. दरम्यान, पुढील सुनावणीवेळी न्या. सूर्य कांत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील.

येत्या 23 नोव्हेंबरला विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणीही तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर झाली होती. उबाठा खासदार अनिल देसाई म्हणाले की, लोकशाहीचे सगळे दरवाजे आम्ही ठोठावले. सर्वोच्च न्यायालय हे अतिउच्च आहे. न्याय वेळेत झाला पाहिजे.

आजही आम्हाला नवी तारीख मिळाली आहे. उबाठा खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की, उशिरा न्याय देणे म्हणजे न्याय नाकारल्यासारखेच आहे. आता निवडणुका झाल्यानंतर निर्णय येणार असेल, तर काही अर्थ नाही. आता हा निकाल केवळ अभ्यासक्रमात शिकवण्यापुरताच उरला आहे.


तत्पूर्वी, गेल्या 8 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आजची तारीख दिली होती. पण आज सकाळपासूनच सुनावणी होणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली. ठाकरे गटाच्या बाजूने सुनावणीला उपस्थित राहणारे वकील असीम सरोदे दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आजही तारीख पे तारीखच होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल लागला तरी चालेल, पण तो लवकरात लवकर लागावा. कायद्यानुसार निकाल लागला तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल असे वाटते.


हे देखील वाचा –

भारत स्वतः सक्षम…’; दिल्ली स्फोट तपासणीबाबत अमेरिकेची महत्त्वाची प्रतिक्रिया

दिल्ली कार स्फोट ‘दहशतवादी घटना’ घोषित; मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सरचिटणीसांची नियुक्ती

Web Title:
संबंधित बातम्या