Pune Tragedy: 8 Dead in Container Crash – पुण्याच्या नवले पुलावर आज सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 20-25 वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा कंटेनर एका ट्रकला धडकून मोठी आग भडकली. या दोन मोठ्या वाहनांमध्ये एक चारचाकी अडकली होती.
आगीमुळे या गाडीतील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात एकूण 8 जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. यावेळी सातार्याहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या अपघातात कंटेनरच्या ड्रायव्हर आणि क्लीनरचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने आधी 20- 25 वाहनांना धडक दिली. त्यानंतर तो शेवटी एका ट्रकला धडकला. या दोन्ही वाहनांच्या मध्ये चारचाकी सापडली. अपघातानंतर काही क्षणांत वाहनांनी पेट घेतला. हा कंटेनर सातार्याहून पुण्याच्या दिशेने जात होता. स्थानिकांनी सांगितले की, नवले पुलावर कंटेनरने अनेक मालवाहतूक गाड्या, दुचाकी, ट्रॅव्हल्स बससह अनेक वाहनांना
धडक दिली.
सुमारे 2 किमीपर्यंत कंटेनर वाहनांना धडक देत होता. हा रस्ता उताराचा असल्यामुळे नियंत्रण मिळवणे अशक्य झाले असावे. या अपघातानंतर अनेक जखमी रस्त्यावर पडले होते. त्यांना येणार्या वाहनांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. येथे आठवड्यातून 1 -2 अपघात घडत असतात.
याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करून अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, परिसरातील रुग्णालयांमध्ये पोलीस पथक पोहचून त्यांच्याकडून जखमींच्या संख्येची पडताळणी करण्यात येत आहे.
वेगवेगळ्या फॉरेन्सिक पथकांच्या माध्यमातून अपघातग्रस्त वाहनांची तपासणी केली जाणार आहे. ससून रुग्णालयात फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन पथक काम करत आहे. या माध्यमातून मृतांची डीएनए तपासणी करून मृतदेह कुटुंबाला देण्यात येणार आहे. या अपघाताबाबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.
हे देखील वाचा –
Delhi Car Blast : ‘भारत स्वतः सक्षम…’; दिल्ली स्फोट तपासणीबाबत अमेरिकेची महत्त्वाची प्रतिक्रिया









