Diabetes Habits : ऑफिसमध्ये काम करताना नकळतपणे तयार होणाऱ्या काही सवयी डायबिटीजच्या रुग्णांसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतात. अनेक लोक औषधे घेऊनही आपली ब्लड शुगर नियंत्रणात का येत नाही, याबद्दल चिंतेत असतात. मात्र, याचे खरे कारण त्यांच्या रोजच्या ऑफिसमधील कामाच्या पद्धतीत आणि सवयींमध्ये दडलेले असू शकते.
कामाचे ठिकाण आणि आपली कार्यशैली या दोन्हीचा थेट परिणाम रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर होतो. जर वेळेत या सवयी सुधारल्या नाहीत, तर डायबिटीजचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण होते.
डायबिटीज बिघडवणाऱ्या ऑफिसमधील 6 हानिकारक सवयी:
जेवणाच्या वेळांमध्ये अनियमितता
डेडलाइन किंवा महत्त्वाच्या मीटिंग्जमुळे अनेकजण वेळेवर जेवण करत नाहीत. दुपारचे जेवण पुढे ढकलणे किंवा पूर्णपणे वगळणे, यामुळे ब्लड शुगरमध्ये मोठे आणि धोकादायक चढ-उतार होऊ शकतात. शरीराला ऊर्जा पुरवण्यासाठी निश्चित वेळी जेवण आवश्यक आहे. जेवणाच्या वेळा पाळा आणि भूक लागल्यास सोबत ठेवलेले हेल्दी स्नॅक्स खा.
रात्री अपुरी झोप
ऑफिसच्या कामामुळे किंवा तणावामुळे रात्री पुरेशी झोप न घेतल्यास, शरीर थकून जाते आणि इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम होतो. यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. डायबिटीजच्या रुग्णांनी रात्री 7 ते 8 तासांची शांत आणि गुणवत्तापूर्ण झोप घेणे आवश्यक आहे.
पुरेसे पाणी न पिणे
ऑफिसमध्ये एसीमध्ये काम केल्याने तहान कमी जाणवते आणि पाणी पिणे कमी होते. शरीरातील पाण्याची कमतरता रक्तातील ग्लुकोजला अधिक सांद्र बनवते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
दीर्घकाळ एकाच जागी बसणे
ऑफिसमध्ये लोक अनेक तास खुर्चीला खिळलेले असतात. सतत बसल्यामुळे शरीराची कॅलरी वापरण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू शकतो. परिणामी, शरीर ग्लुकोजचा ऊर्जेसाठी योग्य वापर करू शकत नाही आणि ब्लड शुगरची पातळी वाढू लागते. खुर्चीवर बसून काम करत असाल, तर प्रत्येक तासाला 3 ते 5 मिनिटे उभे राहून चालण्याची सवय लावा.
वारंवार चहा, कॉफी आणि गोड पदार्थ
कामादरम्यान थकवा जाणवल्यास, ऊर्जा मिळवण्यासाठी अनेकजण साखरयुक्त चहा, कॉफी किंवा गोड स्नॅक्सचा आधार घेतात. हे पदार्थ रक्तातील साखर वेगाने वाढवतात. त्याऐवजी, ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फळे किंवा नट्स खाणे अधिक चांगले आहे.
सतत ताण आणि कामाचे दडपण
कामाचा ताण आणि डेडलाइनचे दडपण डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी खूप धोकादायक आहे, कारण यामुळे ग्लुकोजची पातळी अनपेक्षितपणे वाढू शकते. तणावात शरीर कॉर्टिसोल नावाचा हार्मोन स्रवतो, जो ब्लड शुगरवर नकारात्मक परिणाम करतो. छोटे ब्रेक घेणे, ध्यान आणि श्वासाचे व्यायाम ताण कमी करण्यास मदत करतात.
डायबिटीज फक्त औषधांनी नियंत्रित होत नाही; तुमच्या दैनंदिन सवयी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ऑफिसच्या रूटीनमध्ये हे सोपे बदल करून तुम्ही तुमच्या ब्लड शुगरवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवू शकता.
हे देखील वाचा – शानदार फीचर्सचा राजा! OnePlus 15 स्मार्टफोन भारतात लाँच, मिळेल 7300mAh बॅटरी; किंमत किती?









