Home / महाराष्ट्र / माझे लग्न लावून द्या साहेब! 34 वर्षीय लग्नाळू तरुणाचे शरद पवारांना भावनिक साकडे, राज्यात चर्चेला उधाण

माझे लग्न लावून द्या साहेब! 34 वर्षीय लग्नाळू तरुणाचे शरद पवारांना भावनिक साकडे, राज्यात चर्चेला उधाण

Youth Marriage Letter to Sharad Pawar : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. विशेषतः शेती...

By: Team Navakal
Youth Marriage Letter to Sharad Pawar
Social + WhatsApp CTA

Youth Marriage Letter to Sharad Pawar : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. विशेषतः शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील 34 वर्षीय मंगेश इंगळे या तरुणाने आपल्या लग्नासाठी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे भावनिक साकडे घातले आहे. 8 नोव्हेंबर रोजी शरद पवार अकोला दौऱ्यावर असताना, शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त त्यांना भेटून मंगेशने पत्र दिले.

‘साहेब, तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही’

मंगेश इंगळे याने पत्रात आपली व्यथा मांडली आहे. ‘‘मी 34 वर्षांचा झालो आहे. वय वाढत असल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करेन आणि संसार नीट चालवेन, याची हमी मी देतो. साहेब, मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही,’’ असे त्याने पत्रात नमूद केले आहे.

माध्यमांशी बोलताना मंगेशने सांगितले की, ‘‘मी खूप प्रयत्न केले, पण लग्न जुळले नाही. महाराष्ट्रातील सर्व कामे शरद पवार साहेबांमुळेच होतात, असे सगळे म्हणतात. त्यांना सांगितल्यावर काम होते, या विश्वासानेच मी त्यांना पत्र दिले.’’

मंगेश इंगळे हा कला शाखेत पदवीधर असून, वयाच्या 15 व्या वर्षापासून राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडशी जोडलेला आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे.

शरद पवारांकडून त्वरित दखल

या अनोख्या मागणीची आणि तरुणाच्या व्यथेची शरद पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. मुंबईत पक्षाची बैठक असताना त्यांनी हे पत्र पक्षाचे नेते जयंत पाटील यांना वाचायला सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या तरुणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

अनिल देशमुख यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘‘शरद पवार सर्व समस्यांवर उपाय शोधू शकतात, या अपेक्षेनेच या तरुणाने पत्र लिहिले. साहेबांच्या सूचनेनुसार आता राष्ट्रवादीचे विदर्भातील स्थानिक पदाधिकारी या तरुणासाठी मुलगी शोधण्याचे प्रयत्न करणार आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना लग्न न होणे ही एक सामाजिक समस्या आहे, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.’’

ग्रामीण भागात नोकरदार मुलांना पसंती मिळत असल्याने शेतकरी तरुणांचे लग्न न होणे ही समस्या वाढत आहे. यापूर्वी सोलापूरमध्ये डिसेंबर 2022 मध्ये लग्नाळू तरुणांनी मोर्चा काढला होता.

Web Title:
संबंधित बातम्या