Home / News / Bihar Election – NDA’s Big Win : काँग्रेसचा लज्जास्पद पराभव! लालू पुत्र पूर्ण निष्प्रभ!बिहारमध्ये नितीश-भाजपा! बहिणींनी अभूतपूर्व यश दिले

Bihar Election – NDA’s Big Win : काँग्रेसचा लज्जास्पद पराभव! लालू पुत्र पूर्ण निष्प्रभ!बिहारमध्ये नितीश-भाजपा! बहिणींनी अभूतपूर्व यश दिले

Bihar Election – NDA’s Big Win – बिहारमध्ये चुरशीची लढत होईल हा अंदाज पूर्णपणे फोल ठरवत जदयू नितीश-भाजपा यांच्या एनडीए...

By: Team Navakal
Bihar Election - NDA's Big Win
Social + WhatsApp CTA


Bihar Election – NDA’s Big Win – बिहारमध्ये चुरशीची लढत होईल हा अंदाज पूर्णपणे फोल ठरवत जदयू नितीश-भाजपा यांच्या एनडीए आघाडीची त्सुनामी आली. 243 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने 200 चा आकडा पार केला. काँग्रेसचे पूर्ण पानिपत झाले.

या राष्ट्रीय पक्षाला दोन आकडी विजयही गाठता आला नाही. विशेष म्हणजे लालूप्रसाद यादवांचा पुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदचा दणदणीत पराभव झाला. राजद आणि काँग्रेस महागठबंधनला पन्नाशीही ओलांडता आली नाही. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, पण नितीशकुमार यांच्या पक्षाची आमदार संख्या 43 वरून एकदम 84 वर गेली. नितीशकुमार यांनी बहिणींच्या खात्यात 10 हजार रुपये घातले आणि निवृत्ती वेतन 400 रुपयांवरून 1100 रुपये केले. या दोन बाबींवर नितीश सरकारला घवघवीत यश मिळाले.


सलग 20 वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपा – जदयू युतीला पुन्हा सत्तेवर बसवले. पण आता भाजपाची आमदार संख्या जास्त असल्याने भाजपाचा मुख्यमंत्री होणार का, हा खरा प्रश्न आहे. भाजपाने निवडणुकीआधी नितीश कुमारांचे नाव मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले नव्हते. दुसरीकडे भाजपा पहिल्यांदाच बिहार विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपा कोणता निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपा नितीशकुमार यांचा एकनाथ शिंदे करणार अशीही चर्चा आहे.


पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. किशोर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जदयू पक्षाला 25 ठिकाणी विजय मिळाला तर राजकारण सोडेन असे म्हटले होते. आपला पक्ष किंगमेकर ठरणार असा दावाही त्याने केला होता. मात्र त्यांचा सुपडाच साफ झाला.

गेल्यावेळी काँग्रेस व राजद बरोबर निवडणूक लढलेले लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांना 2020 च्या निवडणुकीत एकाच जागेवर विजय मिळाला. यावेळी मात्र पासवान यांनी नितीशकुमार यांच्यासोबत जाण्याचे ठरवले आणि 29 जागा लढवून 19 जागांवर मोठे यश मिळवले.
मतदारयाद्यांची विशेष फेरपडताळणी अर्थात एसआयआर नंतर ही पहिलीच निवडणूक होती.

एसआयआर म्हणजे विरोधी पक्षांची मते वगळण्याची सरकारी मोहीम असल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे, निकालाकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते. दोन दिवसांपूर्वी आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये जदयू-भाजपा यांना बहुमत मिळाले होते. ही भाकिते निकालादिवशी खरे ठरणार की पुन्हा सपशेल अपयश येणार, याबद्दल चर्चा सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला एनडीए आघाडीच्या बाजूने कल समोर आले. मतमोजणी जशीजशी पुढे जाऊ लागली, तसे हेच चित्र कायम राहिले.


आजच्या निकालात भाजपा 89 जागांवर आघाडी घेत सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपा बिहार राज्यात प्रथमच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल गेल्यावेळी 43 आमदार असलेल्या नितीशकुमार यांच्या जदयूने यावेळी उसळी घेत 85 जागांवर यश मिळवले. जवळपास दुप्पट यश मिळवले. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान अवामी लीग पार्टीला पाच, तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकमोर्चा पार्टीला 5 जागांवर विजय मिळाला. एकट्या एनडीएनेच 243 पैकी 202 जागा जिंकल्या. सत्तास्थापनेसाठी 124 आमदारांचे पाठबळ हवे आहे. जदयूला वगळले, तर भाजपा आणि इतर पक्षांकडे 117 आमदार आहेत.


महागठबंधनाला केवळ 35 जागांवरच समाधान मानावे लागले. गेल्यावेळी विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष असलेली तेजस्वी यादव यांचा राजद तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. 75 जागांवरून राजद 25 जागांवर खाली घसरला. 19 आमदार असलेल्या काँग्रेसला तर केवळ 6 जागांवर विजय मिळवता आला. सीपीआय (एमएल-एल) पक्षाला 2 तर सीपीआय (एम) पक्षाला केवळ एकच
जागा मिळाली.


खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने पाच जागांवर विजय मिळवत सगळ्यांना चकीत केले. गेल्यावेळीही ओवैसींच्या पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. राजकीय जाणकार मुस्लीम मतदार यावेळी ओवैसींना थारा देणार नाहीत, असे सांगत होते. तो अंदाज फोल ठरला. दरम्यान, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला रामगड मतदारसंघाची एकच जागा मिळाली.


विधानसभेत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष झाला असला, तरी मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र राजद अव्वलस्थानी आहे. 142 जागा लढवणार्‍या राजदला 23 टक्के, प्रत्येकी 101 जागा लढवणार्‍या भाजपाला 20 व जदयूला 19 टक्के, तर 60 जागा लढवणार्‍या काँग्रेसला 8 टक्के, तसेच लोजपाला 5 टक्के मते मिळाली. 5 जागांवर विजय मिळवलेल्या एमआयएमला दोन टक्के मते मिळाली आहेत.


दरम्यान, सायंकाळी सत्तास्थापनेच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या. भाजपाचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटायला गेले. बिहार भाजपा प्रभारी असलेले विनोद तावडे हेही राजधानी पाटणा येथील पक्ष मुख्यालयात बसून राजकीय सूत्रे हलवत आहेत. दुसरीकडे, सकाळी कल येण्यास सुरुवात झाल्यापासूनच विरोधी काँग्रेस आणि राजद कार्यालयात अक्षरशः स्मशान शांतता पसरल्याचे बघायला मिळाले.

एनडीएला विजय मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून अभिनंदन केले. ते म्हणाले की, बिहारच्या जनतेने भारताच्या सुरक्षेशी तडजोड करणारे आणि घुसखोर व त्यांच्या हितचिंतकांविरोधात निकाल दिला आहे. मोदी सरकारच्या धोरणावर विश्वास टाकला आहे. व्होटबँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणार्‍यांना जनतेने सडेतोड उत्तर दिले आहे. बिहारच्या जनतेने देशाचा मूड काय हेच सांगितले. मतदारयादी शुद्धीकरण अनिवार्य आहे आणि त्याविरोधातल्या राजकारणाला कोणताही थारा नाही, हे हा
निकाल सांगतो.


लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) नेते, केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले की, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता बिहार आणि बिहारी लोकांमध्ये आहे. पंतप्रधान मोदी व नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार बिहारला पुढे नेण्याचे काम करेल. आजच्या निकालाने अनेक शंका, कुशंकांना उत्तर देण्याचे काम केले आहे. नितीशकुमार यांची प्रकृती, सरकारचे काम, मोदी सरकारचे पाठबळ, माझे बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट व्हिजन, मला मिळालेल्या जागा यांच्यावर प्रश्न उपस्थित करत होते. या सगळ्यांना आजच्या निकालाने सडेतोड उत्तर दिले.

विकास, सुशासनाचा विजय
पवारांकडून अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निकालावर म्हटले की, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जनतेच्या दृढविश्वासाचे प्रतीक आहे. बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. ज्यामुळे राज्यातील नागरिक, विशेषत: महिलांनी या सरकारला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला.
नितीश दहाव्यांदा
मुख्यमंत्री होणार का?
जदयूमध्येच असलेल्या जीतनराम मांझी यांचा 276 दिवसांचा कार्यकाळ वगळता नितीशकुमार हे गेल्या 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर 2025 पासून आतापर्यंत नऊवेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 18 व्या विधानसभेतील या घवघवीत यशानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का, हा खरा प्रश्न आहे. भाजपाकडे 74 आणि जदयूकडे 43 जागा असतानाही गेल्या वेळी नितीश यांना मुख्यमंत्री केले होते. यंदा मात्र भाजपा निव्वळ एनडीएतला नाही, तर बिहार विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे. तर जदयुला वगळूनही भाजपाला एनडीएतील इतर घटक पक्षासोबत बहुमताजवळ जाता येईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी निकालानंतर अधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्र फॉर्म्युलाच लागू होणार का, याची चर्चा सुरू आहे. बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडे यांनी आज सांगितले की, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. नितीशकुमार यांच्यासोबत
चर्चेनंतर हा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, जदयूने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पुन्हा एकदा नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. पण 20 मिनिटांतच ही पोस्ट मागे घेण्यात आली.


तेजस्वी यांची जीत
तेजप्रताप पराभूत


राघोपूर विधानसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतील राजदचे उमेदवार तेजस्वी यादव विजयी झाले. त्यांनी एनडीएच्या उमेदवार सतीश कुमार यांच्यावर 11 हजार मतांनी पराभव केला. राघोपूर मतदारसंघाने यापूर्वी लालू प्रसाद यादव, राबडी देवी हेही विजयी झाले आहेत. तर राजद पक्ष व परिवारातून हकालपट्टी झालेले लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यांनी वैशाली जिल्ह्यातील महुआ विधानसभा मतदारसंघातून जनशक्ती जनता दलाकडून निवडणूक लढवली होती.
पण मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच तेज प्रताप यादव पिछाडीवर होते. त्यांचा दारुण पराभव झाला. या मतदारसंघात लोकशाही जनशक्ती पार्टीचे (रामविलास) संजय कुमार सिंह विजयी झाले.

नितीशकुमार यांचा षटकार
दुपारी बाराच्या सुमारास निकालाची दिशा स्पष्ट झाल्यानंतर जदयूने सोशल मीडियावर एक पोस्टरवर शेअर केले. यामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार हे क्रिकेट मैदानात हातात बॅट षटकार मारतात असे दाखवले आहे. ये लगा सिस्कर असे वाक्य पोस्टरवर लिहिले आहे. तसेच चेंडू सीमापार गेल्याने जंगलराज, घराणेशाही, भ्रष्टाचार हद्दपार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तेजस्वी यादव, राहुल गांधी, मुकेस सहानी यांचे दुःखी फोटो पोस्टरवर आहेत.

लोकगायिका
मैथिली ठाकूर विजयी


गेल्या जुलै महिन्यात वयाची पंचविशी पार केलेली लोकगायिका मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीवर विजयी झाली. तिने राजदचे विनोद मिश्रा यांचा पराभव केला. गेल्यावेळी 2020 मध्ये मुकेश सहानी यांच्या व्हिआयपी पक्षाचे मिश्रीलाल यादव यांनी विनोद मिश्रा यांचा पराभव केला होता.

बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक निष्पक्ष नव्हती आणि त्यामुळे आम्ही विजय मिळवू शकलो नाही. ही लढाई संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची आहे. काँग्रेस आणि इंडिया लोकशाही वाचविण्याचे प्रयत्न प्रभावीपणे सुरू ठेवेल.

  • राहुल गांधी, काँग्रेस नेते

बिहारने प. बंगाल विजयाचा मार्ग मोकळा केला-मोदी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयानंतर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मिथिला येथील प्रसिद्ध मधुबनी स्कार्फ परिधान केला होता. छठी मैयाच्या जयजयकाराने आपल्या भाषणाची सुरुवात करून मोदी म्हणाले की, आजच्या विजयाने केरळ, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांमध्येही नवीन ऊर्जा निर्माण केली आहे. गंगा बिहारमधून वाहते आणि प. बंगालमध्ये पोहोचते. बिहारने बंगालमध्ये भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे.

लाडक्या बहिणींमुळे यश
एकनाथ शिंदेंचे मत

बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्यामुळेच एनडीएला दणदणीत विजय मिळवता आला, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या दणदणीत विजयामध्ये प्रामुख्याने लाडक्या बहिणींचे मोठे योगदान आहे. मी बिहारच्या तमाम लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानतो.

जनतेने लालूप्रसाद यादवांचे जंगलराज साफ नाकारले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील विकासराज स्वीकारले, असे शिंदे म्हणाले. लालूंच्या काळात येथे जंगलराज होते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर लोक घराबाहेर पडत नव्हते. दुकाने बंद केली जात होती. जिकडे तिकडे लूटमार-बलात्कार होत होते. हे सर्व एनडीएच्या राज्यात बंद झाले. अमित शहा यांची चाणक्य निती कामाला आली, त्याची एकत्रित परिणती म्हणून हा नेत्रदीपक विजय मिळाला आहे, असे शिंदे पुढे म्हणाले.

पोटनिवडणुकीत भाजपाने
8 पैकी 6 जागा गमावल्या

बिहार विधानसभा निवडणुकीसह आज देशभरात 7 राज्यांमधील 8 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने बिहारमध्ये विजयी घोडदौड केली. मात्र इतर राज्यातील 6 जागांवर भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानच्या अंता मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रमोद जैन भया यांनी भाजपाच्या मोरपाल सुमन यांचा 15,594 मतांनी पराभव केला.

झारखंडच्या घाटशिला मतदारसंघात माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे पुत्र बाबूलाल सोरेन यांनी भाजपा उमेदवाराला पराभूत झाले. मिझोरामच्या डम्पा मतदारसंघात मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ. आर. ललथंगलियाना 562 मतांनी विजयी झाले. या जागेवर भाजपा उमेदवाराला केवळ 1,541 मते मिळाली.

पंजाबच्या तरणतारणमध्ये आम आदमी पक्षाचे हरमित सिंग संधू यांनी आपची जागा राखली. तर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा जागेवर भाजपा उमेदवार देवयानी राणा यांनी विजय मिळवला. तर बडगाममध्ये पीडीपीचे आगा सय्यद मुंतजीर मेहदी विजयी झाले. तेलंगणाच्या जुबली हिल्समध्ये काँग्रेस आणि ओडिशाच्या नुआपाडा मतदारसंघात भाजपा विजयी झाली.

विकासाचा विजय आहे
मोदींनी मानले आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अभूतपूर्व विजयाबद्दल बिहारच्या जनतेचे आभार मानले. त्यांनी लिहिले की, सुशासनाचा, विकासाचा, जन कल्याणाच्या भावनेचा, सामाजिक न्यायाचा हा विजय आहे. हा प्रचंड जनादेश जनतेची सेवा करण्यासाठी आणि बिहारसाठी नव्या संकल्पासह काम करण्याकरिता ताकद देणारा आहे. एनडीएने राज्याचा चौफेर विकास केला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार, चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाह यांचे प्रचंड विजयाबद्दल
अभिनंदन करतो.

एनडीए 2025
भाजपा – 89
जदयू – 85
एचएएम (हम) – 5
आर एलएम – 4
लोजप – 19
एकूण – 202

महाआघाडी 2025
राजद – 25
काँग्रेस – 6
भाकप (एमएल) -2
माकप – 1
आयआयपी – 1
एकूण – 35


Web Title:
संबंधित बातम्या