Devendra Fadnavis on Bihar Election Results : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए (NDA) आघाडीने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर देशभरातील भाजप नेते आनंद व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीस म्हणाले की, बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि नितीश कुमार यांच्या स्वच्छ प्रशासकीय प्रतिमेवर विश्वास ठेवून एनडीएला (NDA) मोठे बहुमत दिले आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी (160 जागांच्या) पुढे जाण्याची अपेक्षा केली होती, पण जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम दिले. विकास आणि सुशासन हाच बिहारमध्ये प्रमुख मुद्दा ठरला, जातीच्या राजकारणाला जनतेने नाकारले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘विषारी’ प्रचाराला मतदारांचे प्रत्युत्तर
एनडीएच्या या विजयाला फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये केलेल्या ‘विषारी’ प्रचाराला मतदारांनी दिलेले प्रत्युत्तर मानले आहे.
फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने संवैधानिक संस्थांवर आरोप करत आहेत. संवैधानिक मार्गाने चालणाऱ्या प्रक्रियेला विरोध करणे आणि जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा अपमान करणे, हे जनतेच्या मताचा अपमान आहे. जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्वीकारत नाहीत आणि अशा प्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करणे सुरू ठेवतील, तोपर्यंत काँग्रेसचे पतन होत राहील.”
काँग्रेसची दयनीय स्थिती
बिहारमधील निकालांवरून काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, असे फडणवीस म्हणाले. “बिहारमध्ये काँग्रेसची हालत एमआयएम (MIM) आणि कम्युनिस्ट पक्षांपेक्षाही खाली घसरली आहे. बिहारच्या निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसचा हा सर्वात कमी स्कोअर आहे,” असे ते म्हणाले.
‘आत्मपरीक्षण करा’ राहुल गांधी यांनी ‘व्होट चोर’चा मुद्दा उपस्थित करून यात्रा काढली, नदीत उड्या मारून पाहिल्या, डान्स करून पाहिला, पण याचा काही उपयोग झाला नाही. लोकांचा विश्वास फक्त नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरच कायम आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आघाडीतील पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली आहे, तरीही मुख्यमंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान मोदी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा – Srinagar Blast : दिल्लीनंतर आता श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट! 9 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी









