Mamdani Backs Starbucks Strike – स्टारबक्समधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कंपनीच्या देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला न्यूयॉर्कचे नवनियुक्त महापौर झोहरान ममदानी यांनी समर्थन दिले. त्यांनी जनतेलाही या आंदोलनात कर्मचाऱ्यांना साथ देण्याचे आवाहन केले.
स्टारबक्स वर्कर्स युनायटेड या संघटनेने कंपनीच्या रेड कप डे या सर्वाधिक कॉफी विक्री होणार्या दिवशी रेड कप रिबेलियन या नावाने अनिश्चित संपाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी नो कॉन्ट्रॅक्ट, नो कॉफी अशी घोषणा दिली.
कर्मचाऱ्यांनी योग्य करार करून चांगले वेतन आणि लाभ, सुरक्षित आणि सन्माजनक कामाचे वातावरण, अन्यायकारक कामाची पद्धत बंद करण्याच्या मागण्या केल्या आहेत. देशातील २५ मोठ्या शहरांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने स्टारबक्सच्या कामावर मोठा परिणाम झाला.
हजारो कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनच्या मते, हा संप स्टारबक्सच्या इतिहासातील सर्वात मोठा व सर्वाधिक काळ चालणारा कर्मचारी संप ठरू शकतो. कंपनी कराराबाबत कर्मचारी संघटनेशी चर्चा करणे टाळत आहे. नॅशनल लेबर रिलेशन्स बोर्डाकडे यासंदर्भात हजारपेक्षा जास्त अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या आंदोलनाला पाठिंबा देत न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोहरान ममदानी यांनी समाजमाध्यमांवर लिहिले की, देशभरातील स्टारबक्स कर्मचारी अन्यायकारक कामाच्या पद्धतींविरोधात लढत आहेत. ते संपावर आहेत तोपर्यंत मी स्टारबक्समधून काहीही खरेदी करणार नाही. तुम्हीही या आंदोलनाला पाठिंबा देऊन या संपात सहभागी व्हा.
हे देखील वाचा –
सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक









