Kashinath Chaudhary- महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर जिल्ह्यात साधू चिन्मयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ही घटना घडली तेव्हा भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले होते. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, ही मागणी करत भाजपाने मोर्चे काढले होते. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhary)हे या घटनेतील मुख्य सूत्रधार असल्याचा भाजपाकडून आरोप करण्यात आला होता. याच काशिनाथ चौधरींचा भाजपात प्रवेश होणार होता. परंतु यावरून जोरदार टीका झाल्यानंतर भाजपाने या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली.
डहाणूत झालेल्या या प्रवेश समारंभात भाजपाच्या अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, या पक्षप्रवेशामुळे भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले की, पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपाने आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपाने पक्षात घेतले. मग पालघर हत्याकांडामागे भाजपाच होते, असे म्हणायचे का? हेच भाजपाचे ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे. राजकारणासाठी भाजपा कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झाले. कोणत्याही विषयाचे राजकारण करून भाजपाकडून सत्तेची पोळी भाजली जाते, पण यामुळे सामाजिक संतुलन बिघडून त्याचे मोठे नुकसान राज्याला सहन करावे लागते, याचातरी भाजपाने विचार करावा.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षप्रवेशाचे समर्थन केले होते. ते म्हणाले की, हा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात आला आहे. मला जेव्हा हा निर्णय समजला तेव्हा मी याविषयी माहिती घेतली. मुळात या पक्षप्रवेशावरून आमच्यावर जे लोक आरोप करत आहेत ते कालपर्यंत का गप्प होते?चौधरी कालपर्यंत त्यांच्याबरोबरच होते, तेव्हा असे आरोप का केले नाहीत? म्हणजे कालपर्यंत ते विरोधकांसाठी चांगले होते. आज आमच्याकडे आले तर वाईट झाले? त्या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात आला आहे. त्या तपासातून काय समोर आले ते सर्वांनी पाहिले आहे.
चौधरी यांच्या प्रवेशावर चौफेर टीका झाल्यावर मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी या प्रवेशाला स्थगिती दिली. तसा आदेश भाजपाच्या पालघर जिल्हाध्यक्षांना पाठवला.महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असताना 16 एप्रिल 2020 रोजी, महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्षे) आणि सुशीलगिरी (35 वर्षे) हे दोन महंत आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (30) हे गुरू श्री महंत रामगिरी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जात होते. कोरोनामुळे मुख्य मार्गावर पोलीस बंदोबस्त असल्याने ते आतील गावांतील मार्गाने जात होते. डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात त्यांची गाडी अडवण्यात आली. चोर समजून त्यांच्यावर जमावाने दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या समक्ष ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. साधूंना केलेल्या मारहाणीचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. या घटनेनंतर तब्बल 200 लोकांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या घटनेची दखल घेतली होती. त्यानंतर 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. न्यायालयीन प्रक्रियेअंती, काही आरोपींना सशर्त जामीन मिळाला आहे. आधी या प्रकरणाचा तपास सीआयडीने केला. अलीकडेच राज्य सरकारने या प्रकरणी नव्याने चौकशी करण्यास अनुमती दिल्यावर सीबीआयने तो आपल्या हातात घेऊन 18 ऑक्टोबर 2025 रोजी या प्रकरणी तीन स्वतंत्र तक्रारी दाखलकेल्या आहेत.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच दाखल झाला गुन्हा..
नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा









