MNS- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक इंजिन या पक्षचिन्हावर न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवरच युती-आघाडीचा निर्णय घेण्याचे आदेशही मनसेने (MNS)पक्ष पदाधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी करत असलेल्या पक्षातील इच्छुकांना मोठा झटका बसला आहे.
पक्षाने स्थानिक पदाधिकार्यांना स्पष्ट आदेश दिले की, स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून आणि आपल्या गरजेनुसार इतर समविचारी पक्षांसोबत युती किंवा आघाड्या करून निवडणूक लढवावी. उमेदवारांना पक्षाच्या चिन्हाऐवजी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
मनसेकडून महापालिका निवडणुका लढवण्यासाठी मोठ्या पातळीवर तयारी सुरू आहे. पण नगरपालिका न लढवण्याच्या या निर्णयाचा मनसेच्या तालुका पातळीवरील संघटनेला फटका बसत आहे. नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या इच्छुकांना वेगळा पर्याय निवडावा लागत आहे. रायगड, अंबरनाथ व नाशिक येथील काही पदाधिकारी भाजपा आणि शिंदे गटात गेले. तर काही ठिकाणी मनसेचे मूळ कार्यकर्ते आता भाजपा किंवा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मुंबई महापालिकेत मनसेने उबाठासोबत एकत्र लढवण्याची तयारी सुरू केली आहे. पण नगरपालिका निवडणुकीत मात्र उबाठासोबत बोलणी होत नसल्याने मनसैनिकांना उमेदवारीसाठी भाजपा किंवा शिंदे गटाच्या पॅनेलमध्ये जावे लागत आहे. एकेकाळी वर्चस्व असलेल्या नाशिकमध्येही मनसेकडून एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही.
दरम्यान, बदलापुरात मनसेच्या स्थानिक नेत्या संगीता चेंदवणकर यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उबाठाकडे मशाल चिन्ह द्या, अशी मागणीही केली. पण प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
—————————————————————————————————————————————————-
हे देखील वाचा –
मलिक यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा









