Home / महाराष्ट्र / Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार!भाजपा आमचे कार्यकर्ते फोडते! फडणवीसांकडे तक्रार

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार!भाजपा आमचे कार्यकर्ते फोडते! फडणवीसांकडे तक्रार

Eknath Shinde- स्थानिक स्वराज्य संस्थ्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमधील भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात पक्षप्रवेशांवरून आज नाराजी चांगलीच उफाळून आली....

By: Team Navakal
Eknath Shinde
Social + WhatsApp CTA

 Eknath Shinde- स्थानिक स्वराज्य संस्थ्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमधील भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात पक्षप्रवेशांवरून आज  नाराजी चांगलीच उफाळून आली. शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकला. त्यानंतर हे मंत्री भाजपा आमच्या पक्षातील पदाधिकारी फोडते, अशी तक्रार घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेले. मात्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसमोर (Eknath Shinde) त्यांच्या मंत्र्यांनाच तंबी दिली. या फोडाफोडीची सुरुवात उल्हासनगरात तुम्हीच केलीत, आता शेवट आम्ही करू, अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना निरुत्तर होऊन परतावे लागले.


स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून नेते, कार्यकर्त्यांच्या पळवापळवीला ऊत आला आहे. यामध्ये भाजपा  आघाडीवर आहे. विरोधी पक्षातील नेत्यांबरोबरच भाजपा महायुतीतील घटक पक्षांच्या अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मुंबईसह आसपासच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आदि महापालिकांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी भाजपाने पक्षाचे दरवाजे सताड उघडले आहे. त्यातून शिवसेनेच्या नेत्यांना किंवा शिंदे गटाच्या विरोधकांना गेल्या काही दिवसांत भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांच्यासह शिंदेंच्या तीन माजी नगरसेवकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपात प्रवेश दिला. अनमोल म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनाच गळाला लावून भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला मोठाच धक्का दिला. त्यामुळे शिंदे गटातील खदखद उफाळून आली. विशेष म्हणजे, शिंदे सेनेने काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमधील सहा नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. तेव्हापासून भाजपाने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक फोडण्याचा चंगच बांधला आहे.


या फोडाफोडीचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर पडले. शिंदेंच्या गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक,  भरत गोगावले या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी उघड केली. मंत्रिमंडळ बैठकीला जर एखाद्या मंत्र्याला काही तातडीच्या कारणामुळे अनुपस्थित राहायचे असेल तर मुख्यमंत्र्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र शिंदे गटाचे मंत्री अशी कोणतीही पूर्व परवानगी न घेता बैठकीला अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित होते. मात्र,  मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच उपस्थित होते. तेव्हा शिवसेनेचे मंत्री शिंदे यांच्या दालनातच बसले होते.  मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर स्वतः एकनाथ शिंदे हे गुलाबराव पाटील, शिरसाट, सरनाईक आणि गोगावले आदि मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले. त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी नुकत्याच शिंदे गटातून भाजपात झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजपा युतीधर्माचे पालन करत नाही, अशी तक्रार केली. पक्षप्रवेशाचा सपाटा लावणार्‍या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात नाराजीही व्यक्त केली. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिंदेंसमोरच त्यांना खडसावत म्हटले की, याची सुरुवात तुम्ही उल्हासनगरपासून केली. भाजपाला खिंडार पाडले. मग आम्ही तुम्हाला जशास तसे उत्तर दिले. तुम्ही जे केले ते आम्ही चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर ते चालणार नाही, असे अजिबात चालणार नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांना गळाला लावणार असाल तर आम्हीही तुमच्याशी तसेच वागू. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू.  त्यामुळे यापुढे दोन्ही पक्षांनी पथ्य पाळावे. तुम्ही पथ्य पाळा, आम्हीही पाळू. एकमेकांच्या नेत्यांना यापुढे पक्षात प्रवेश द्यायचा नाही.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना  सांगितले की, आम्ही महायुती म्हणूनच लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे महायुतीतील वातावरण खराब होऊ नये, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी भूमिका आहे. भाजपातून शिवसेना, शिवसेनेतून भाजपा किंवा महायुतीच्या पक्षांत कोणतेही पक्षप्रवेश होणार नाहीत आणि प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असे आमचे ठरले आहे. तसा आदेश मी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना दिला आहे. फडणवीस हेदेखील तशा सूचना आपल्या पदाधिकार्‍यांना देतील, महायुतीत मिठाचा खडा पडेल, असे कृत्य कोणीही करू नये.


शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, नाराजीचा काही प्रश्न नाही, एका कुटुंबातही वादविवाद होत असतात. हे तर तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे थोड्या काही मनातल्या भावना ज्या आहेत, त्या व्यक्त करायच्या असतात. आज मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो. आमच्या काही भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. त्यावर तोडगाही निघाला. नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूक आल्यापासून सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. काही लोक भाजपातून आमच्यात येत आहेत. तर काही आमच्याकडून भाजपात जात आहेत. अनेक गोष्टी स्थानिक पातळीवर होत असल्याने वरिष्ठ पातळीवर कळत नाहीत. त्यामुळे थोडी फार नाराजी आहे. परंतु  मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खडसावले, असे काही बैठकीत नाही. यावर सकारात्मक पद्धतीने, गुण्यागोविंदाने तोडगा निघाला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते, नगरसेवक, आमदार यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये, असे ठरले आहे. आज प्रवेश झाले, ते झाले. पण उद्यापासून याची अंमलबजावणी होईल.


तर मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना भेटायला काय हरकत आहे. आम्हाला  काही हवे असल्यास आम्ही त्यांनाच सांगणार. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला हे खरे नाही. सध्या नगर परिषद, नगरपालिका निवडणुका होत असल्याने अनेक मंत्री आपल्या जिल्ह्यात आहेत. मुख्यमंत्र्यांची अनुमती घेऊनच ते आज अनुपस्थित होते. भाजपाचेही आठ मंत्री आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. आजच्या बैठकीत पक्षप्रवेशाचा कुठलाच विषय नव्हता. महायुतीत आम्ही ठरवले आहे की, मित्रपक्षातील कुणालाच पक्षात प्रवेश द्यायचा नाही. मध्यंतरी शिवसेनेतून भाजपात काही लोक आले. काही भाजपातून शिवसेनेत गेले. त्यामुळे कदाचित नाराजी असेल. पण तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून यावर
निर्णय घेतील.


शिवसेना आणि भाजपा यांच्यातील या वादावर शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र एक्स सोशल मीडियावर पोस्ट करून खोचक टीका करण्याची संधी साधली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत. का, तर म्हणे राग आला. भयंकर राग, मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर. याला म्हणतात ‘चोर मचाए शोर’.

शिंदेंचे 20 आमदार साथ सोडणार?
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज असा दावा केला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपले आमदार भाजपात जाणार अशा बातम्यांमुळे नाराज झाले आहेत. शिंदेंचे 20 आमदार मागेच त्यांना सोडण्यासाठी तयार झाले होते. ते भाजपामध्ये जाण्यासाठी शिवसेना सोडतील अशा बातम्या आहेत. मला काल काही लोक भेटले, तेव्हा हे समजले. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाला सोडले, आता तुमच्यासोबतही असेच होईल. ही नाराजी अशीच सुरू राहील. पुढे जाऊन त्यात आणखी भर पडेल. त्यानंतर महिना-दोन महिन्यात चित्र खूप बदललेले दिसेल. राजकारणात कोणतीही उलथापालथ होऊ शकते. भाजपा या सर्वांना सरळ करेल. त्याची सुरुवात आता झाली आहे.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा –

मलिक यांच्याविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

ठाण्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या