What is Cloudflare : जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अनेक ऑनलाइन सेवा अचानक बंद पडल्याचे पाहायला मिळाले. अनेक यूजर्सला चॅटजीपीटी, ट्विटर, कॅनव्हासह अनेक ऑनलाइन सेवा वापरण्यासाठी समस्या आल्याचे पाहायला मिळाले. यामागचे कारण होते क्लाऊडफ्लेअर (Cloudflare) या इंटरनेट पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपनीतील मोठा तांत्रिक बिघाड. काही वेळानंतर ही सेवा सुरू झाली असली तरीही जगभरात अशाप्रकारे ऑनलाइन सेवा बंद पडण्याची घटना सातत्याने पाहायला मिळते.
ओपेनएआय (OpenAI), ट्विटर (Twitter-X), स्पॉटिफाय (Spotify), कॅनव्हा (Canva) आणि क्लॉड (Claude) यांसारख्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर याचा थेट परिणाम झाला. हा बिघाड इतका मोठा होता की आउटेज (Outage) ट्रॅक करणारी ‘डाऊनडिटेक्टर’ (Downdetector) ही सेवा देखील तात्पुरती विस्कळीत झाली होती. मात्र, अनेक सामान्य यूजर्सना हा प्रश्न पडतो की, एक कंपनी डाऊन झाल्यास संपूर्ण इंटरनेट कसे विस्कळीत होऊ शकते?
Cloudflare काय आहे?
इंटरनेटचा सुरक्षित पुल क्लाऊडफ्लेअर ही एक अतिविशाल आणि अत्यंत महत्त्वाची ऑनलाइन सेवा आहे. तुम्ही भेट देत असलेला वेबसाइटचा मूळ सर्व्हर यांच्यामध्ये ती एक सुरक्षित आणि जलद मध्यस्थ म्हणून काम करते. जगातील लाखो वेबसाइट्स आणि ऑनलाइन ॲप्लिकेशन्स क्लाऊडफ्लेअरच्या सेवेवर अवलंबून आहेत. म्हणूनच, जेव्हा या मध्यस्थाच्या नेटवर्कमध्ये बिघाड होतो, तेव्हा त्याच्यावर अवलंबून असलेल्या सर्व मोठ्या साइट्सचे वापरकर्त्यांशी असलेले कनेक्शन तुटते.
Cloudflare च्या महत्त्वाच्या सेवा आणि फायदे
क्लाऊडफ्लेअर जगातील सर्वात मोठ्या ‘कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स’पैकी एक चालवते. याची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे आहेत:
वेबसाइटचा वेग वाढवणे: ही कंपनी वेबसाइटचा डेटा जगभरातील अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हरवर संग्रहित करते. यामुळे, वापरकर्त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या सर्व्हरवरून डेटा मिळतो आणि वेबसाइट्स अत्यंत वेगाने उघडतात.
सायबर हल्ल्यांपासून संरक्षण: ही कंपनी वेबसाइट्सना मोठ्या सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक ढाल म्हणून काम करते. हे हल्ले रोखून वेबसाइटचा मूळ सर्व्हर सुरक्षित ठेवते.
सुरक्षा फिल्टर्स: क्लाऊडफ्लेअर वेब अॅप्लिकेशन फायरवॉलसारखे सुरक्षा फिल्टर्स प्रदान करते, जे हॅकर्सच्या चुकीच्या रिक्वेस्ट्स मूळे सर्व्हरपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवतात.
बिघाडाचा परिणाम: सेवा खंडित का झाल्या?
ज्या मोठ्या ऑनलाइन सेवा बंद पडल्या (उदा. X, Spotify), त्यांच्या स्वतःच्या सर्व्हरमध्ये कोणतीही समस्या नव्हती. क्लाऊडफ्लेअर त्यांच्या सेवेच्या ‘पुढच्या लेव्हलवर’ असल्याने कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण झाली. त्यामुळे, त्यांच्या सर्व ग्राहकांच्या वेबसाइट्सपर्यंत जाण्याचा मार्ग एकाच वेळी बंद झाला आणि ‘डोमिनो इफेक्ट’प्रमाणे अनेक सेवा ठप्प पडल्या.
हे देखील वाचा – Al Falah University : दिल्ली स्फोट कनेक्शन! अल-फलाह विद्यापीठाचे संस्थापक ईडीच्या जाळ्यात









