Home / महाराष्ट्र / Pune News : शेकोटी पेटवण्यास पुणे महापालिकेकडून बंदी! थंडीत उब घेणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

Pune News : शेकोटी पेटवण्यास पुणे महापालिकेकडून बंदी! थंडीत उब घेणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

Pune News : राज्यभरात थंडीची लाट पसरली असताना आणि अनेक ठिकाणी नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवत असतात. त्यातच आता...

By: Team Navakal
Pune News
Social + WhatsApp CTA

Pune News : राज्यभरात थंडीची लाट पसरली असताना आणि अनेक ठिकाणी नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवत असतात. त्यातच आता पुणे (Pune) महापालिका प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरपुणे महापालिका आयुक्त नवल किशोर रामयांनी शहरातील रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी शेकोट्या पेटवण्यास पूर्णपणे मनाई करणारे आदेश दिले आहेत.

प्रदूषणाचे कारण आणि परिणाम पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले आणि निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर लाकूड, कोळसा, कचरा, प्लास्टिक किंवा रबर जाळून शेकोट्या पेटवतात. यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे शहराचे हवा प्रदूषण वाढत आहे.

शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड, पीएम 10, पीएम 2.5 आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढतो.

नागरिकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांवर धावणारी खासगी आणि सरकारी वाहने, तसेच बांधकाम प्रकल्पांवरील धुळीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि फक्त शेकोटीवर कारवाई करत असल्याचा दावा केला जात आहे.

नियमांचे उल्लंघन आणि दंडात्मक कारवाई शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने ‘हवा (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम, 1981’ अंतर्गत भाग 4 कलम 19 (5) आणि ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016’ मधील कलम 15 (छ) नुसार नियम बनवले आहेत.

पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ किंवा प्लास्टिक जाळण्यास मनाई आहे. गृहनिर्माण संकुलातील वॉचमन , सफाई कामगार, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल.

या आदेशामुळे रात्रीच्या वेळी उघड्यावर काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर थंडीत कुडकुडण्याची वेळ आली आहे, अशी नाराजी पुणेकरांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा – Cloudflare नक्की काय आहे? यातील समस्येमुळे जगभरातील ऑनलाइन सेवा का बंद पडल्या? वाचा

Web Title:
संबंधित बातम्या